Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लाखो भाविकांच्या उपस्थितीत मांढरदेवच्या काळूबाईचा गजर
ऐक्य समूह
Wednesday, January 03, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: re3
प्रशासनामुळे भाविकांना सहज-सुलभ दर्शन
5वाई, दि. 2 : ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ च्या जयघोषाने आज मांढरगड दुमदुमून गेला. सोमवारपासून सुरू झालेल्या या यात्रेत लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. शाकंभरी पौर्णिमेला मंगळवारी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा न्यायाधीश राजेश लढ्ढा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनीता लढ्ढा यांच्या हस्ते काळेश्‍वरी देवीची विधिवत महापूजा करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे चेअरमन, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नामदेव चव्हाण व पत्नी सौ. लक्ष्मीदेवी चव्हाण, प्रांताधिकारी सौ. अस्मिता मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके, तहसीलदार तथा प्रशासकीय विश्‍वस्त अतुल म्हेत्रे, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ व विश्‍वस्त अ‍ॅड. मिलिंद ओक, अ‍ॅड. महेश कुलकर्णी, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, सुधाकर क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर, राजगुरू कोचळे व सचिव आर. एन. खामकर उपस्थित होते.
रांगेतील पहिले दाम्पत्य बाजीराव मारुती चौधरी व सौ. सुभद्रा चौधरी (रा. किवळे, ता. खेड, जि. पुणे) यांचा न्या. लढ्ढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हे दाम्पत्य गेली दहा वर्षे दर्शनासाठी येत आहे. आज पहाटे चार वाजता त्यांनी नंबर लावला होता. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यावर्षी पुजारी सोमनाथ क्षीरसागर यांनी देवीची पूजा बांधली. गटविकास अधिकारी अशोक भवारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता क्रांतिकुमार मिरजकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता राजकुमार साठे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव, वनक्षेत्रपाल महेश झांझुर्णे, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आर. सी. रुणवाल, अन्न सुरक्षा अधिकारी डी. एस. साळुंखे, आर. एम. खंडागळे, वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे आदी उपस्थित होते. 
कलीना सांताक्रूझ, मुंबई येथील प्रकाश रामभाऊ कालेकर यांच्यावतीने गाभारा, सभामंडप, मंदिर व कळसास फुलांची आरास करण्यात आली होती. प्रथेप्रमाणे देवीला 111 तोळे सोन्याचा मुखवटा व 51 तोळ्यांचा राणी हार घालण्यात आला होता.  देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई, पुणे, बीड, अहमदनगर, ठाणे, रायगड, सोलापूर, नाशिक, सातारा या जिल्ह्यांबरोबरच कर्नाटक व आंध प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने वाई व भोर मार्गे गडावर आले होते. ठिकठिकाणी राहुट्या टाकून भाविकांनी मुक्काम केला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: