Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लाच मागणार्‍या बुध येथील तलाठी आणि कोतवालाला अटक
ऐक्य समूह
Wednesday, January 03, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 2 : खुदाई केलेल्या विहिरीची नोंद सातबारावर घेवून तो दाखला देण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच तक्रारदारांकडे मागितल्याप्रकरणी बुध, ता. खटाव येथील तलाठी व कोतवाल या दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
अटक केलेल्यांची तलाठी संदीप गोरखनाथ काटकर (वय 38, सध्या रा. कोडोली, सातारा. मूळ रा. नरवणे, ता. माण) व कोतवाल संजय जोतिबा चव्हाण (वय 48, रा. बुध) अशी नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांनी विहीर खुदाई केली होती. त्याची नोंद त्यांना सातबारावर करायची होती. या कामासाठी तक्रारदार हे तलाठी काटकर व कोतवाल चव्हाण या दोघांना भेटले असता संशयितांनी तक्रारदार यांच्याकडे 1 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबधंक विभागात दि. 28 नोव्हेंबर 2017 रोजी तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याबाबतची पडताळणी केली असता संशयित दोघांनी 1 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.   
पैशाची मागणी केल्यानंतर संशयितांनी ती रक्कम मात्र स्वीकारली नाही. अखेर पैशाची मागणी झाल्याने त्यानुसार दि. 2 जानेवारी रोजी दोघांना ताब्यात घेवून अटक केली. दोन्ही संशयितांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार द्यावी. तसेच 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: