Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
देशभरातील डॉक्टरांचा संप मागे
ऐक्य समूह
Wednesday, January 03, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: na2
‘एनएमसी’ विधेयक संसदीय समितीकडे
5नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्या संदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या महत्त्वाकांक्षी विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने मंगळवारी सुरू केलेला देशभरातील डॉक्टरांचा 12 तासांचा संप मागे घेण्यात आला आहे. हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा तत्काळ सुरू करण्यात याव्यात, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले. त्यामुळे हा संप आठ तासांनी मागे घेण्यात आला.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची जागा घेण्यासाठी नव्या संस्थेची स्थापा करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक शुक्रवारी संसदेत मांडण्याची तयारी सुरू केली होती. या विधेयकातील तरतुदींनुसार, एमबीबीएसची पदवी घेणार्‍या डॉक्टरांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर होमिओपॅथी किंवा आयुर्वेदाबरोबर अ‍ॅलोपॅथीचा व्यवसाय करायचा झाल्यास डॉक्टरांना ‘ब्रिज कोर्स’ करण्याची सक्ती करण्यात आली आहे. आधुनिक वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी किमान पात्रता एमबीबीएस असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामध्ये तीन सदस्य राहणार असून या आयोगाची राष्ट्रीय होमिओपॅथी परिषद आणि राष्ट्रीय आयुर्वेदीय परिषद यांच्याबरोबर वर्षातून किमान एक वेळ बैठक होणे आवश्यक आहे. या विधेयकाला आयएमएने विरोध केला आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेचा व सहभागाचा विचार करण्यात आलेला नाही. या समितीमध्ये डॉक्टरांचा सहभाग अधिक हवा. मात्र, त्यात बिगरवैद्यकीय व्यक्तींचा सहभाग वाढवण्यात आला आहे. 
वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक व तज्ज्ञांना त्या क्षेत्राशी संबंधित निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले गेले नाही तर रुग्णहित जपले जाणार नाही, असा आक्षेप आयएमएने घेतला आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी 12 तास बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे, असे आयएमएने जाहीर केले होते.
मात्र, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात येईल, असे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत सांगितल्यानंतर आयएमएने डॉक्टरांचा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे देशभरातील खाजगी रुग्णालयांची व आस्थपनांची रुग्णसेवा आठ तास ठप्प झाली होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: