Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे मुंबईसह राज्यात संतप्त पडसाद
ऐक्य समूह
Wednesday, January 03, 2018 AT 10:55 AM (IST)
Tags: mn1
अनेक ठिकाणी रास्ता रोको; दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान
5मुंबई, दि. 2 (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले आहेत. सोमवारी झालेल्या घटनेमुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको करून निषेध नोंदवला. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक एस. टी. बसेससह शेकडो वाहनांचे नुकसान झाले आहे. भीमा-कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांनी बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. दरम्यान, भीमा-कोरेगावमधील हिंसाचाराची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून या घटनेची विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कालच्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबाला दहा लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक येथील समाधीचा वाद काही दिवसांपासून सुरू आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने भीमा-कोरेगाव येथे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. या लढ्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या महार बटालियनने प्रमुख भूमिका बजावली होती. ब्रिटिशांच्या या विजयाचा दिवस दलित संघटना साजरा करतात. या लढ्याला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यातून अनेक दलित लोक आले होते. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी सोमवारी रॅली काढली. त्याच वेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीतून संघर्षाची ठिणगी पडली. बाहेरून आलेल्या गाड्यांवर दगडफेक करून जाळपोळ करण्यात आली. याची तीव्र प्रतिक्रिया आज राज्यभर उमटली. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात कालच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त रास्ता रोको केले. मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर व मुलुंडसह अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्ते वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हार्बर रेल्वे मार्गावरील गोवंडी स्थानकात रेल रोको आंदोलन केल्याने या रेल्वे मार्गावरची वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले. मात्र, पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत काही काळानंतर आंदोलकांना हटवून वाहतूक पूर्ववत केली. मात्र, अफवांचे पेव फुटल्याने शहराच्या अनेक भागातील दुकाने बंद झाली होती.
आज महाराष्ट्र बंद!
भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडी व डाव्या पक्षांच्यावतीने बुधवारी महाराष्ट्र बंद करण्याची हाक दिली आहे. या घटनेमुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्या तरी शांततामय मार्गाने बंद पाळण्यात यावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे. वढू येथील वाद आणि सणसवाडी येथे झालेल्या घटना वेगवेगळ्या आहेत. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे प्रकरण चिघळले. हिंसाचार सुरू असताना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कॉल केला असता, त्यांचा फोन ‘आऊट ऑफ कव्हरेज’ होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या कार्यलयाकडे सुरुवातीला या घटनेची माहितीही नव्हती. दगडफेकीनंतर पोलिसांची कुमक उशिरा पोहोचली, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
शिवराज प्रतिष्ठान, हिंदू एकता आघाडीचे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व स्थानिक नेते घुगे हे कालच्या घटनेचे सूत्रधार असून त्यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांमार्फत दगडफेक करायला लावली. तिथल्या गाड्याही जाळल्या. भीमा-कोरेगाव येथून परत जाणार्‍या लोकांना मारहाण करुन गाड्याही जाळल्या, असा आरोप आंबेडकर यांनी केला. कोरेगाव ते शिरुरपर्यंतच्या इमारतींवर दगड ठेवण्यात आले होते. या इमारतींवरुन दगडफेक करण्यात आली.           
मुंबईसह राज्यात संतप्त पडसाद
त्यामुळे शिरुर-कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचे शासकीय अनुदान दोन वर्षांसाठी बंद करण्याची मागणीही आंबेडकर यांनी केली.
न्यायालयीन चौकशी करणार : मुख्यमंत्री
भीमा-कोरेगाव येथील झालेल्या हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भीमा-कोरेगाव लढ्याच्या स्मृतिदिनी हजारो लोक दरवर्षी तेथे येतात. यंदा 200 वर्षे पूर्ण होत असल्याने अंदाजे साडेतीन लाख लोक तेथे आले होते. त्यासाठी पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही लोकांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यामुळे पोलिसांच्या सहा कंपन्या आधीच तैनात करण्यात आल्या होत्या. दगडफेक आणि गाड्यांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. मात्र, पोलिसांनी अतिरिक्त कुमक लावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्रीपर्यंत सर्व उपस्थितांना बसमध्ये बसवून सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. पोलिसांच्या सजगतेमुळे दंगल घडली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कालच्या हिंसाचारामागे कोणाचा हात आहे याची सीआयडीकडूनही चौकशी सुरू केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कालच्या घटनेनंतर एक मृतदेह आढळून आला असून मृताच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ज्यांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, त्यांनाही राज्य सरकारकडून मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा आहे. त्यांनी कधीही जातीयवादाला थारा दिला नाही. जे लोक यांना मानतात, त्यांनी जातीयवाद पसरणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी संयम दाखवल्याने अफवा पसरल्या नाहीत. मात्र, सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तेढ निर्माण करणारी विधाने कोणीही करू नयेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संयम ठेवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यभरात तीव्र पडसाद
भीमा-कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद राज्यातील अनेक शहरांमध्येही उमटले. पुणे, पिंपरी-चिंचवडसह अंमळनेर, जालना, अकोला, बुलडाणा, लातूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर, यवतमाळ, परभणी, हिंगोली, सांगली या जिल्ह्यांमध्ये दलित संघटनांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. दलित कार्यकर्त्यांनी अनेक शहरे व गावांमध्ये फिरून दुकानदारांना दुकाने बंद करायला लावली. अनेक ठिकाणी एस. टी.च्या बसेसवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडण्यात आल्या. विविध ठिकाणी टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कराडमध्येही अनेक बसेस व वाहनांवर दडगफेक करुन काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली.
पुणे स्टेशन परिसरातील पीएमटीच्या बसेस जमावाने अडवून प्रवाशांना खाली उतरण्यास भाग पाडले. एका बसचा घाबरलेला चालक बसमधून उतरून पळून गेल्याने पोलीस कर्मचार्‍याने स्टेअरिंगवर बसून बस बाजूला नेली. संतप्त जमावाने रस्त्यावर सायकलचे टायर जाळले तर अनेक बसेसच्या काचा फोडल्या. पोलिसांनी पुणे स्टेशनकडे जाणारे रस्ते बंद करुन परिस्थिती नियंत्रणात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही ही भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद उमटले. पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही लेन तब्बल साडेतीन तास बंद ठेवल्या होत्या. या प्रकरणी छत्रपती समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे व शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. जमावाने चारचाकी गाड्यांच्या काचाही फोडल्या. पिंपरीत विशाल टॉकिजमधील चित्रपटाचा खेळ संतप्त जमावाने बंद पाडला. निगडी प्राधिकरणात सावरकर भवनाची काच फोडण्यात आली. रिक्षातून आलेल्या तीन-चार तरुणांनी भवनावर दगडफेक केली. वल्लभनगर आगारात दुपारपर्यंत आलेल्या एस. टी. बसेस थांबविण्यात आल्या होत्या. पिंपरी-चिंचवडमध्येही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी दुपारी बारा वाजल्यापासून भीमसैनिक जमा झाले. त्यांनी महामार्गाच्या दोन्ही लेनवर ठिय्या मांडल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संतप्त जमावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत संभाजी ब्रिगेड व भिडे गुरुजी यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
हिंसाचाराला प्रशासन जबाबदार : शरद पवार
सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारामागे काही हिंदुत्ववादी संघटना असल्याचा संशय व्यक्त करताना, प्रशासनाने पुरेशी खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडला असावा, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. जे घडले ते महाराष्ट्राला शोभणारे नाही. हे प्रकरण अधिक चिघळणार नाही, याची दक्षता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांसह सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरात येऊन तीन-चार दिवसांपासून चिथावणी देण्याची भूमिका घेतली होती, असे तिथले लोक सांगत आहेत. त्यामुळे आधीपासूनच येथे अस्वस्थता होती. भीमा-कोरेगाव येथे लाखोंच्या संख्येने लोक येणार, हे माहिती असल्याने प्रशासनाने खबरदारी घ्यायला हवी होती. ती प्रशासनाने न घेतल्यामुळे आणि अफवा व गैरसमज अधिक पसरल्याने हा प्रकार घडल्याचे पवार म्हणाले. या प्रकरणात सामंजस्याची भूमिका घेऊन सामाजिक सलोखा कायम राहील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
भीमा-कोरेगावला दरवर्षी लोक जातात. आजपर्यंत कधीही तेथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. भीमा-कोरेगाव लढाईला 200 वर्षे पूर्ण झाल्याने मोठ्या संख्येने लोक येणार, याची कल्पना होती. तेथील परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी केला असावा. जे घडले, त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांनी सामंजस्य आणि संयमाने हा विषय हाताळावा. कोणीही प्रक्षोभक वक्तव्य करू नये, असे आवाहन पवार यांनी केले.
राहुल गांधींचा भाजप, संघावर हल्ला
भीमा-कोरेगाव हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. भारतीय समाजव्यवस्थेत दलित समाज सर्वात तळाशी राहावा, अशी फॅसिस्ट प्रवृत्ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच बाळगली आहे. उनामधील घटना, रोहित वेमुला प्रकरण आणि आता भीमा-कोरेगावमधील घटना, या दलितांच्या प्रतिकाराची सामर्थ्यवान प्रतीके आहेत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या ट्विटमुळे या घटनेला राजकीय वळण लागण्याची चिन्हे आहेत.
सखोल चौकशी करा : आठवले
भीमा-कोरेगावमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हजारो, लाखो कार्यकर्ते येतात; पण आजवर कधीही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी काही लोकांनी जाणीवपूर्वक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. ज्यांनी हिंसा भडकावली त्यांच्यावर आणि दोषी पोलीस अधिकार्‍यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. शिवाजी महाराजांचे मावळे एकमेकांवर हल्ले करताहेत, हे दृश्य कोणालाही आवडणारे नाही. लोकांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले.
कुटील डाव हाणून पाडा : चव्हाण
भीमा-कोरेगावच्या घटनेचा तीव्र निषेध करताना, सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणार्‍या समाजविघातक शक्तींचा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. भीमा-कोरेगाव येथे यंदा लाखो लोक संख्येने येणार असल्याची पोलिसांना पूर्ण कल्पना होती. आरएसएसशी संबंधित लोकांनी चार-पाच दिवसांपासून अफवा पसरवून परिस्थिती बिघडवण्याचे काम केले होते. याची पूर्ण कल्पना असतानाही पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत. पुण्यातून आलेल्या काही समाजकंटकांनी हिंसाचार केला. पोलिसांनी काहीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
पूर्वनियोजित कट : मलिक
भीमा-कोरेगाव प्रकरण अचानक घडलेले नसून हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. या परिसरात समाजकंटकांकडून वातावरण तापवण्याचा प्रयत्न होत होता. वढू बुद्रुक येथे गोविंद महार यांची समाधी काहींनी उद्ध्वस्त केल्याची माहिती पोलिसांना होती, असा आरोप मलिक यांनी केला. या प्रकरणात संबंधितांची नुसती न्यायालयीन चौकशी करुन उपयोग नाही तर संबंधित संघटनांच्या नेत्यांना तत्काळ अटक करुन त्यांच्यावर ‘मोक्कां’तर्गत कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: