Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोरेगाव-भीमा घटनेचे कराडमध्ये पडसाद
ऐक्य समूह
Wednesday, January 03, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: re1
तुफान दगडफेकीत वाहनांसह दुकानांची तोडफोड, तणावपूर्ण वातावरण
5कराड, दि. 2 : भीमा-कोरेगाव येथील घटनेचे जोरदार पडसाद कराड शहरात मंगळवारी उमटले. दुपारी एकच्या सुमारासकराड शहरातून आंबेडकर अनुयायांनीघोषणाबाजी करत मोर्चा काढला. यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर प्रांत कार्यालया-पासून निघालेला मोर्चा बसस्थानक, विजय दिवस चौक, उपजिल्हा रुग्णालय मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येवून धडकला. जमावाने दुकाने, वाहनांची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाच मोठ्या वाहनांसह चार इमारतीच्या काचा  जमावाकडून फोडण्यात आल्या. दोन एस. टी. बसेस, तीन चार चाकी वाहनांसह हॉटेल अलंकार, अर्बन बझार, संकेत सोनोग्राफी व जनता बझारवरही जमावाने दगडफेक केली.  त्यामुळे दुपारपासून शहरात तणावपूर्ण शांतता होती. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. शहरातील बुधवार पेठ, भाजी मंडई परिसर, स्टेशन रस्ता अशा विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.  मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास कराड शहरात शेकडोंचा जमाव जमला. जमावाने बसस्थानकासमोरील हॉटेल अलंकारसह अन्य दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर जमाव बसस्थानक चौकातून पुढे विजय दिवस चौकाकडे गेला. तेथेही उघड्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. विजय दिवस चौकात उभ्या असणार्‍या प्रवासी वाहतूक रिक्षांवरही जमावाने दगडफेक केली. त्यामध्ये रिक्षांच्या काचा फुटल्या. अचानक झालेल्या दंग्यामुळे सर्वांची एकच धावपळ उडाली. काय होतय हे समजण्यापूर्वीच दुकानांवरही दगडफेक  सुरू झाली. कर्मवीर भाऊराव पुुतळ्यालगच्या भागात तुफान दगडफेक झाली.  जमाव रस्त्याने पुढे आला. यावेळी जमावाने अलंकार हॉटेलला लक्ष्य बनवत  मोठ्या कांचावर दगडफेक केली. प्रसंगावधान राखून अलंकार हॉटेलच्या व्यवस्थापनांनी मोठ्या कांचाचे शटर बंद केले. मात्र, इमारतीच्या मुख्य काचेवर दगड बसल्याने ती फुटून नुकसान झाले. दुपारनंतर निर्माण झालेला तणाव आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची ज्यादा कुमक मागविण्यात आली होती. आक्रमक झालेल्या जमावाने जनता बँकेसमोर असलेल्या महागड्या चारचाकीसह जनता बझारवर दगडफेक केल्याने नुकसान झाले. जमाव उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकातून पुढे आंबेडकर पुतळ्याजवळ गेला. तेथे जमावाने ठिय्या मांडले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कोरेगाव-भीमा येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे शहरात अनेक अफवांचे पेव फुटले होते.  तणावपूर्ण वातावरणामुळे यात अधिक भर पडत होती. सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण कायम होते. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील बाजूस रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन चारचाकी व दुचाकी गाड्यांची जमावाकडून तोडफोड करण्यात आली. मंगळवारी कराडची बाजारपेठ बंद असल्याने बहुतांशी दुकाने बंदच असतात. मात्र, दगडफेकीच्या प्रकारामुळे सकाळी उघडलेली दुकाने व्यापार्‍यांनी तत्काळ बंद केली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कराडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गर्दी व तणावाचे वातावरण असल्याने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास कृष्णा नाका येथे वडापाव गाड्यांवर दगडफेक झाली. दरम्यान, दगडफेक केल्याप्रकरणी ओगलेवाडी व कराड परिसरातील सुमारे शंभरहून अधिक अज्ञातांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जातीय सलोखा राखण्याचा सर्व पक्षीय बैठकीत निर्णय
कराडसह परिसरात मंगळवारी दगडफेक व तणावपूर्ण वातावरण या पार्श्‍वभूमीवर रात्री साडेआठच्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे तातडीची सर्वपक्षीय बैठक झाली. शहरात जातीय सलोखा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. बैठकीस आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, प्रांताधिकारी हिंमत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: