Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकिस्तान कपटी, विश्‍वासघातकी
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn1
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वर्षारंभीच टीका
5वॉशिंग्टन, दि. 1 (वृत्तसंस्था) : अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची मदत मिळूनही त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला केवळ कपट आणि विश्‍वासघात मिळाला आहे. अमेरिकेने गेली 15 वर्षे पाकिस्तानला मूर्खासारखी 33 अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी ही मदत दिली गेली तरी पाकिस्तानने उलट दहशतवाद्यांना आश्रयच दिला आहे. पाकिस्तान अमेरिकी नेत्यांना मूर्ख समजतो, अशी टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. नववर्षारंभीच ट्रम्प यांनी पाकिस्तानवर टीका करणारे ट्विट केले आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने आर्थिक मदत केली. त्याच्या मोबदल्यात पाकिस्तानने आम्हाला कपट आणि फसवणुकीशिवाय काहीच दिले नाही, असे ट्विट ट्रम्प यांनी सोमवारी सायंकाळी केले. या ट्विटमुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. नव्या वर्षात ट्रम्प यांच्या अजेंड्यावर पाकिस्तान सर्वात वरच्या स्थानावर आहे किंवा नाही, हे समजू शकले नसले तरी यापुढे पाकिस्तानला अमेरिकेकडून मदत मिळणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प प्रशासन पाकिस्तानची 255 दशलक्ष डॉलर्सची मदत रोखण्याच्या विचारात असल्याची माहिती अमेरिकेच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी नुकतीच फोडली होती. दहशतवादी आणि त्यांच्या प्रायोजकांवर कारवाई करण्याबाबत आपण गंभीर आहोत, हे पाकिस्तानने दाखवून दिल्याशिवाय ही मदत देऊ नये, असे ट्रम्प प्रशासनातील अधिकार्‍यांचे मत आहे. ही बातमी फुटल्यानंतर काही दिवसांतच ट्रम्प यांनी पाकिस्तानविरोधात ट्विट केले आहे.
ट्रम्प यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेने मुर्खासारखी गेल्या 15 वर्षांत पाकिस्तानला तब्बल 33 अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. मात्र, त्याच्या मोबदल्यात आम्हाला केवळ कपट आणि फसवणूक मिळाली आहे. दहशतवादाला पाठबळ देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही ट्रम्प यांनी ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानने त्यांच्या देशात दहशतवाद्यांना आश्रय दिला आणि आम्ही शेजारच्या अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत राहिलो.     
त्यासाठी पाकिस्तानने आम्हाला थोडी फार मदतही केली. मात्र, यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगत ट्रम्प यांनी भविष्यात पाकिस्तानला आर्थिक मदत न करण्याचे संकेत दिले.
ट्रम्प यांच्या या कठोर टीकेला पाकिस्तानने आक्षेप घेत लगेचच आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. लवकरच सत्य संपूर्ण जगासमोर येईल. ट्रम्प यांनी ट्विटरवरून उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आम्ही लवकरच भूमिका स्पष्ट करू. सत्य आणि काल्पनिक गोष्टींमधील फरक जगासमोर आणू, असे ट्विट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले.
अमेरिकेने दक्षिण आशियाबद्दलचे धोरण स्पष्ट केल्यापासूनच अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात काही प्रमाणात वितुष्ट आले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने पाकिस्तानातील आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतरही ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तान हा गोंधळ, हिंसा आणि दहशतवाद पसरवणार्‍यांचा आश्रयदाता असल्याचे ट्विट ट्रम्प यांनी त्यावेळी केले होते. सईद याने निवडणूक लढवल्यास त्याच्यावरील दहशतवादी हा शिक्का पुसला जाईल, अशी पाकिस्तानची छुपी भूमिका आहे. मात्र, ट्रम्प यांनी याबद्दल पाकिस्तानला इशारा देताना सईद हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी असून अमेरिकेने त्याच्या डोक्यावर इनाम ठेवल्याची आठवण करुन दिली आहे. पाकिस्तानी भूमीत वावरणार्‍या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी अमेरिकेने दबाव वाढवला असला तरी चीन आणि सौदी अरेबिया या आश्रयदात्यांकडून आपल्याला भरपूर मदत मिळेल. त्यामुळे अमेरिकेचा दबाव झुगारून देता येईल, असे पाकिस्तानला वाटते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: