Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारत-पाक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची गुप्त बैठक
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: na3
पाकिस्तानी अधिकार्‍याचा गौप्यस्फोट
5इस्लामाबाद, दि. 1 (वृत्तसंस्था) ः भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची थायलंडमध्ये नुकतीच गुप्त बैठक झाल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने केला आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नाताळनंतर गुप्त बैठक झाल्याचे वृत्त एका भारतीय इंग्रजी दैनिकाने नुकतेच दिले होते. आता पाकिस्तानी अधिकार्‍याच्या गौप्यस्फोटामुळे त्याला दुजोरा मिळाला आहे.
भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि पाकचे सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नसीर खान जंजुआ यांच्यात थायलंडमध्ये 27 डिसेंबरला गुप्त बैठक झाली, असा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला.
हेरगिरीच्या आरोपांखाली पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची 25 डिसेंबरला भेट झाली होती. या भेटीनंतर दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये बँकॉक येथे बैठक झाली. या बैठकीत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत दोेवल यांची भूमिका सकारात्मक आणि मैत्रिपूर्ण होती. दोन्ही देशातील राजनैतिक पातळीवरील प्रश्‍न सोडवण्यास या बैठकीमुळे मदत होणार आहे, असे पाकिस्तानी अधिकार्‍याने सांगितले.
‘द ट्रिब्यून’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बँकॉकवरून परतल्यावर नासीर खान जंजुआ यांनी माजी पंतप्रधान नवाझशरीफ यांची भेट घेतली.  त्यांच्यात जवळपास पाच तास चर्चा झाली. दोवल यांच्याशी झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती जंजुआ यांनी शरीफ यांना दिली. शस्त्रसंधीचे उल्लंघन, दोन्ही देशांमधील संबंध आदी मुद्द्यांवर भारताशी चर्चा झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मात्र, या भेटीबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मौन बाळगले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: