Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटणजवळ भररस्त्यात स्कूल बस अचानक पेटली
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: re1
चालकाच्या प्रसंगावधानामुळे विद्यार्थी सुखरूप; आगीत बस भस्मसात
5दुधेबावी, दि. 1 : तिरकवाडी येथील जयभवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थीवाहक बसने अंतर्गत वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अचानक पेट घेतला. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांना कोणतीही इजा पोहोचली नाही. ही घटना फलटण-दहिवडी रस्त्यावर कोळकीनजीक नववर्षारंभी सोमवारी सायंकाळी घडली.
तिरकवाडी येथील जयभवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची बस (क्र. एमएच-11-सीएच-0609) शाळा सुटल्यानंतर  विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघाली असता फलटण-दहिवडी रस्त्यावर अंतर्गत वायरिंगमधील शॉर्टसर्किटमुळे बसने सायंकाळी 5.15 च्या सुमारास अचानक पेट घेतला. त्यामुळे वाहनचालक व विद्यार्थी भयभीत झाले; परंतु वाहनचालक संतोष भिसे यांनी प्रसंगावधान दाखवले. ग्रामस्थांनीही सहकार्य केल्याने विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विद्यार्थी व बसचालक बसमधून सुखरूप बाहेर पडले तरी बस पूर्णपणे जळून खाक झाली.
यावेळी नऊ विद्यार्थी व चालक संतोष भिसे बसमध्ये होते. या घटनेची माहिती समजताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, जयभवानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आनंदराव शितोळे, हायस्कूलचे  प्राचार्य नामदेवराव बोराटे, पर्यवेक्षक अशोक गुंजवटे, कोळकीचे उपसरपंच वैभव नाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सहकार्य केले.
घटनेची माहिती फलटण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचा बंब तत्काळ घटनास्थळी पाठवण्यात आला. अग्शिनमन दलाच्या कर्मचार्‍यांनी बसची आग आटोक्यात आणली. त्यासाठी दुधेबावी, तिरकवाडी, वडले, कोळकी, सोनवडी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
फलटण शहर आणि तालुक्यात शालेय मुलांची वाहतूक करणारी खाजगी वाहने मोठ्या संख्येने आहेत. काही वाहने जुनी असून परिवहन विभागाकडून या वाहनांची कसलीच तपासणी केली जात नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आजच्या घटनेने शालेय विद्यार्थांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: