Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘जैश’कडून 16 वर्षांच्या दहशतवाद्याचा व्हिडिओ
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: mn2
‘सीआरपीएफ’च्या केंद्रावरील हल्ल्यात सहभाग
5श्रीनगर, दि. 1 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रावर रविवारी पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात स्थानिक युवकांचा समावेश होता. या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी फरदीन अहमद खांदे हा अवघ्या 16 वर्षांचा होता. त्याचा एक व्हिडिओ ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने प्रसिद्ध केला आहे. खांदे हा दहावीचा विद्यार्थी होता. आश्‍चर्याची बाब, म्हणजे त्याचे वडील जम्मू-काश्मीर पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
रविवारी पहाटे 2.30 च्या सुमारास सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले तर भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम सोमवारी संपुष्टात आली. सोमवारी तिसर्‍या दहशतवाद्याचाही मृतदेह सापडला. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये  16 वर्षीय फरदीन याचाही समावेश असून त्याचा व्हिडिओ ‘जैश’ने जारी केला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध होईपर्यंत मी स्वर्गातील नवा पाहुणा असेन. काश्मिरी युवक बेरोजगारीमुळे नव्हे तर जिहादसाठी शस्त्रे हाती घेत आहेत. बेरोजगारीमुळे काश्मिरी युवक शस्त्रे हाती घेत असल्याचा अपप्रचार सुरू आहे. काश्मीरमध्ये भारताचा शेवटचा सैनिक मारला जाईपर्यंत हा जिहाद सुरू राहील. भारतीय सैनिक आमच्या महिलांची अब्रू लुटत आहेत. त्यांनी आमची भूमी ताब्यात घेतली आहे. मी आणि माझ्या मित्रांनी कुराणची हाक ऐकून जिहादच्या रणभूमीत उडी घेतली आहे, असे फरदीन म्हणत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कॅप्टन  शरीफ-उद-दीन गनाई, तौफिल अहमद, राजेंद्र नैन, प्रदीपकुमार पडा आणि निरीक्षक कुलदीप रॉय हे जवान शहीद झाले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: