Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विजय केशव गोखले नवे परराष्ट्र सचिव
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) : चीनमध्ये भारतीय राजदूत म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळणारे आणि डोकलाम वाद मिटवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे भारतीय परराष्ट्र सेवेतील अनुभवी अधिकारी आणि महाराष्ट्राचे सुपुत्र विजय केशव गोखले यांची देशाचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोखले यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असणार आहे. विद्यमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ 28 जानेवारी रोजी संपत असून विजय गोखले 29 जानेवारीला परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील.
भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) 1981 च्या बॅचचे अधिकारी 58 वर्षीय विजय केशव गोखले सध्या परराष्ट्र खात्यात सचिव (आर्थिक घडामोडी) या पदावर कार्यरत आहेत. गोखले यांनी जर्मनी, हाँगकाँग, चीन आणि मलेशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यावर आज शिक्कामोर्तब केले. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून गोखले यांच्या नियुक्तीचे आदेश तत्काळ काढण्यात आले. नियमानुसार परराष्ट्र, संरक्षण, अर्थ सचिव, सीबीआय संचालक आणि इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असते.
डोकलाम वादामुळे गोखले यांचे नाव चर्चेत आले होते. चीनमधील भारताचे राजदूत राहिलेल्या गोखले यांनी या वादात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. वाद टोकाला जाऊ नये म्हणून गोखले यांच्यावर सारी मदार होती.  
गोखले यांनी आपले कसब पणाला लावून चीनला नमते घेण्यास भाग पाडले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
विजय गोखले यांच्या आधी 1979 ते 1982 या कालावधीत पुण्याचे राम साठे यांनी देशाचे परराष्ट्र सचिव म्हणून काम केले होते. त्यांच्यानंतर मराठी माणसाला दुसर्‍यांदा परराष्ट्र सचिव होण्याचा मान मिळाला आहे. विद्यमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची 29 जानेवारी 2015 रोजी परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2017 मध्ये निवृत्तीच्या काही दिवस आधीच त्यांना एक वर्षाची बढती देण्यात आली होती. आता त्यांच्या जागी गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: