Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिधापत्रिकेवर धान्य बंद केल्याने पळशीत अनेक कुटुंबांवर संकट
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: re4
5पळशी, दि. 1 : येथील पुरवठा विभागाने ट्रॅक्टर व वाहने असल्याचे कारण पुढे करून अपुर्‍या माहितीद्वारे अनेकांची केशरी रेशनकार्ड बंद केल्याने धान्य पुरवठा बंद झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. योग्य ती चौकशी
करून केशरी रेशनकार्ड पुन्हा देण्याची मागणी सबंधीतांनी केली आहे.
पुरवठा विभागाने ट्रॅक्टर असल्याचे कारण पुढे करून अनेकांची केशरी रेशनकार्ड रद्द केली. अनेकांचा धान्यपुरवठा बंद केला आहे. त्या मध्ये ट्रॅक्टर नसलेल्यांबरोबर ज्यांनी ट्रॅक्टर घेतला होता पण सध्या विकला आहे त्यांचीही केशरी शिधापत्रिका रद्द करण्यात आली असल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे. तसेच काही जणांनी दुसर्‍यांचा ट्रॅक्टर भाडेतत्वावर चालवायला घेतला आहे. त्यांनाही याचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे अनेक कुटुंबे वेगवेगळी आहेत. मात्र अजूनही अनेकांच्या शिधापत्रिका एकत्र असल्याने एखाद्या भावाचा ट्रॅक्टर असला तरी त्याचे नाव एकत्र शिधापत्रिकेत असल्याने विनाकारण काहींना फटका बसला आहे. पुरवठा विभागाच्या कारभाराने दुष्काळात तेरावा महिना, असे बोलले जात आहे. दुसरी शिधापत्रिका काढण्यासाठी पुरवठा विभागाकडून मोठी दिरंगाई होत असते. महिनो- महिने हेलपाटे मारायला लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ज्याच्या कुटुंबात कोणाच्याच नावावर ट्रॅक्टर नसेल तर त्यांच्यी शिधापत्रिका का बदलली? तर उलट काहीकडे ट्रॅक्टर आहे पण यादीत नाव का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा सर्वे कुणी केला हे पुरवठा अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगण्यास नकार दिला. त्यामुळे त्या शिधापत्रिका रद्द वा एकत्रित असलेल्या शिधापत्रिकांचे त्वरित विभाजन करून देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पुरवठा विभागाचा नेहमीच सावळागोंधळ!
पुरवठा विभाग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. येथे कामे वेळेत होत नसल्याच्या ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. नवीन शिधापत्रिका व शिधापत्रिका विभाजन व अन्य कामासाठी खूप दिरंगाई लागते. जनतेला अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात. येथे एजंटही सक्रिय असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथे नेहमीच सावळा गोंधळ पहायला मिळतो .
...तर पूर्वीप्रमाणे शिधापत्रिका देवू
शिधापत्रिकेमधील व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर
असेल तरच त्या शिधापत्रिका बदलल्या असतील. ट्रॅक्टरच नाही, अशा लोकांना पूर्वीप्रमाणे शिधापत्रिका दिली जाईल.
- राहुल जाधव, पुरवठा अधिकारी, माण.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: