Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यातील पाच मटकाबहाद्दर एक वर्षासाठी तडीपार
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 1 : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालवणार्‍या टोळीचा प्रमुख धनाजी पवार याच्यासह रोहित जगताप, उदय मोरे, सूरज कदम व संदीप कदम यांना सातारा जिल्हा हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
टोळीप्रमुख धनाजी सदाशिवपवार (वय 28, रा. प्रतापसिंहनगर, खेड), रोहित राजेंद्रजगताप (वय 25, रा. वनवास-वाडी), उदय मारुती मोरे (वय 35, रा. अमरलक्ष्मी, शिवनगर, सातारा), सूरज तानाजी  कदम (वय 23, रा. क्षेत्रमाहुली), संदीप बापू कदम (वय 36, रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा) ही टोळी शहर पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा मटका व जुगार अड्डे चालवत होती. त्यांना वेळोवेळी गुन्ह्यांमध्ये अटक करून सुधारण्याची संधी देण्यात आली. त्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा जनतेस उपद्रव होत असल्याने कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यांच्याकडून शहर हद्दीत हिंसक घटना घडून दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून या टोळीच्या पाच सदस्यांना तडीपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सातारा शहर पोलीस ठाण्यातर्फे प्रस्ताव देण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये त्यांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
आदेशाची बजावणी झाल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांनी जिल्ह्याच्या हद्दीबाहेर गेले पाहिजे, असा आदेश देण्यात आला आहे. या कारवाईचे स्वागत होत आहे. जिल्ह्यात समाजामध्ये दहशत पसरवणार्‍या आणि बेकायेदशीर कारवाई करणार्‍या टोळ्यांविरुद्ध तडीपारची कारवाई सुरूच राहणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: