Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बिबट्याचा दोन शेळ्यांवर हल्ला
ऐक्य समूह
Tuesday, January 02, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: re3
नाटोशी ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली
5नाटोशी, दि. 1 : मोरणा भागातील नाटोशी येथे सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास तळीचा माळ नावाच्या शिवारात बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला केला. यामध्ये एक शेळी जागीच ठार झाली. दुसर्‍या शेळीला घेऊन बिबट्या घनदाट जंगलात पसार झाल्याने या भागातील ग्रामस्थ पुन्हा एकदा भीतीच्या छायेखाली आहेत.
मोरणा भागातील अनेक गावांमध्ये बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक शेळ्या, कुत्री, कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. वनविभागाने मोरणा भागात अनेक गावांमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र, बिबट्याने वन विभागाला प्रत्येक वेळी चकवा दिला आहे. आज एका गावात तर उद्या दुसर्‍या गावात बिबट्या मुक्काम ठोकत असून वाहनचालक व   ग्रामस्थांना  बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. सोमवारी पुन्हा एकदा बिबट्याने मोरणा भागात पाळीव जनावरांवर हल्ला केला. नाटोशी गावातील शेतकरी सुरेश कुंडलीक देसाई हे पाळीव जनावरे व शेळ्या चारण्यासाठी गावाच्या पश्‍चिमेला डोंगरपठारावरील तळीचा माळ शिवारात गेले होते. तेथे जनावरे चरत असताना झुडपातून बिबट्याने शेळ्यांवर अचानक हल्ला केला. देसाई यांनी घाबरलेल्या अवस्थेतही बिबट्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार झाली तर दुसर्‍या शेळीला घेवून बिबट्या झाडीत पसार झाला.
सुरेश देसाई यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनाधिकारी लोखंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, शिवारात बिबट्याकडून शेळ्यांवर होणार्‍या वाढत्या हल्ल्यामुळे मोरणा भागातील शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: