Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हा पोलीस दलाची ‘स्मार्ट’ कामगिरी
ऐक्य समूह
Monday, January 01, 2018 AT 11:46 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 31 : पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सातारा जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यापासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाचा कारभार ‘स्मार्ट’ झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. अशी कामगिरी करणारा सातारा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. पोलीस दलाने नवनवीन तंत्रज्ञान अवगत करुन अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर सावकारी प्रकरणी टोळ्यांवर ‘मोक्का’ लावण्यापासून 2017 या वर्षात अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवून जिल्हा पोलीस दल या वर्षात राज्यात अव्वल क्रमांकावर नेले आहे. जिल्ह्यात सावकारी व खंडणी प्रकरणी नऊ टोळ्यांवर ‘मोक्कां’तर्गत तर 47 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. 
‘पर्यटन पोलिसिंग’ची संकल्पना
पाचगणी, महाबळेश्‍वर या जगप्रसिद्ध पर्यटननगरींमध्ये असलेल्या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ‘पर्यटन पोलिसिंग’ ही अनोखी संकल्पना राबवण्यात आली आहे. पर्यटकांना कोणताही त्रास न होता निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटता यावा, हा या संकल्पनेचा उद्देश आहे. त्यासाठी 35 स्वतंत्र पर्यटन पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यासाठी असलेल्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कर्मचार्‍यांना गस्तीसाठी शासकीय दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पर्यटन हंगामाच्या कालावधीत पाचगणी व महाबळेश्‍वरमधील सर्व पॉइंटपर्यंत वाहतुकीचा खोळंबा होत होता. वाई-महाबळेश्‍वर रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना तासन्तास खोळंबत राहावे लागत होते. ही गैरसोय टाळण्यासाठी नेमण्यात आलेले पर्यटन पोलीस आणि सुट्ट्यांच्या हंगामात पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काढलेली ‘नो पार्किंग’ची अधिसूचना यामुळे या निसर्गसंपन्न शहरांमधील पर्यटन सुरक्षित आणि आरामदायी होत आहे. त्यामुळे स्थानिक हॉटेल व  इतर व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाचगणी, कराड तालुका व रहिमतपूर येथे नवीन आधुनिक इमारत बांधणीचा प्रस्ताव शासनास पोलीस महासंचालकांमार्फत पाठवण्यात आला होता. त्यास शासनाकडून मंजुरी मिळून या पोलीस ठाण्यांचे कामकाज नवीन इमारतीत सुरू झाले आहे. म्हसवड पोलीस ठाण्यांतर्गत पळशी पोलीस दूरक्षेत्राच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. 
सायबर गुन्हेगारीवर वचक
मोबाईलसारखी अत्याधुनिक संपर्कसाधने आणि सोशल मीडियामुळे जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढली असून त्यावर वचक ठेवण्यासाठी नव्याने सायबर प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाल्यानंतर वर्षारंभी सायबर पोलीस ठाण्याचीही स्थापना करण्यात आल्याने सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात जिल्हा पोलीस दल यशस्वी ठरले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जिल्ह्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पुरवण्यात आली असून खून, चोर्‍या, घरफोड्या, बलात्कार आदी गुह्यांमध्ये पुरावे व ठसे गोळा करण्यासाठी या व्हॅनचा उपयोग केला जात आहे. यापूर्वी जिल्ह्यात अशा गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व पुरावे तपासणीसाठी पुणे व मुंबई येथे पाठवावे लागत होते. या न्यायवैद्यक प्रयोगशाळांचा अभिप्राय येण्यास बराच कालावधी जात असल्याने त्याचा गुह्यांच्या तपासावर परिणाम होत होता. त्यामुळे पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यात स्वतंत्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेसाठी पाठपुरावा केला आहे. सध्या फॉरेस्निक मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून काम सुरू असल्याने अनेक गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळाली आहे.
पोलिसांसाठी घरे
जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यां-साठी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत लिंब खिंडीच्या परिसरात गौरीशंकर नॉलेज सिटीजवळ परवडणार्‍या दरात प्रत्येकी 1200 स्न्वेअर फुटांच्या 168 प्लॉटस्चा भव्य प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पातील प्लॉटधारकांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
‘स्मार्ट’ पोलीस ठाणी
पोलीस प्रमुखांच्या सूचनेनुसार उपक्रमशीलता दाखवल्याने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. असा बहुमान मिळवणारा सातारा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. पोलीस बिनतारी संदेश विभागात अ‍ॅनालॉग रेडिओ यंत्रणा 2014 मध्ये डिजिटल मोबाईल रेडिओ यंत्रणेवर कार्यन्वित करण्यात आल्याने पोलीस दलाचे कामकाज सुलभ आणि परिणामकारक झाले आहे. जिल्हा पोलीस दलात सुसज्ज 248 वाहने असून त्यामध्ये वज्र, फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन, बीडीडीएस मोबाईल, श्‍वानपथक, बिनतारी संदेश मोबाईल, दंगानियंत्रण मोबाईल, अल्पोपहार वाहन, पाण्याचा टँकर, वर्किंग ट्रक, पायलट व्हॅन, पीसीआर मोबाईल व्हॅन यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस दलाने लोकसहभागातून सुमारे 300 ते 400 सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी बसवले आहेत. त्यामुळे अनेक गुन्हे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद होत असून गुन्हेगारांना पकडण्यात सीसीटीव्ही फुटेजची मदत होत आहे.
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
जिल्ह्यात या वर्षी नोव्हेंबरपर्यंत सावकारी प्रकरणी 46 गुन्हे दाखल असून ‘मोक्का’ कायद्यांतर्गत 24 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बोकाळलेला सावकारीचा बीमोड झाला आहे. कुप्रसिद्ध गुन्हेगार प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर आणि त्याच्या साथीदारांना शहर पोलीस ठाण्यात सावकारी गुह्याखाली अटक करण्यात आली. एकदा त्यांना न्यायालयात नेले जात असताना पोलिसांची व्हॅन नादुरुस्त झाली. त्यामुळे या गुन्हेगारांची न्यायालयापर्यंत चालत वरात काढण्यात आली. त्यामुळे जनतेच्या मनातील भीती मोडली आहे. महामार्गालगत वाढलेली गुन्हेगारीही मोडीत काढण्यात पोलिसांना यश आले आहे. औद्योगिक वसाहतीत 24 तास गस्त सुरू आहे. जिल्ह्यात सावकारी व खंडणी प्रकरणी 9 टोळ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर झोपडपट्टीदादा (एमपीडीए अंतर्गत) कारवाईचे नऊ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये 61 प्रस्ताव करण्यात आले असून 16 प्रस्तावांमध्ये 47 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 56 अन्वये तडीपारीचे 46 व कलम 57 प्रमाणे तडीपारीचे 97 प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.  इतर अवैध धंद्यांवरही कारवाया करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर अखेर जुगार प्रकरणी 685 गुन्ह्यांमध्ये 944 संशयितांना अटक करुन त्यांच्याकडून एकूण 63 लाख 28 हजार 389 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अवैध दारुधंद्यांचेही कंबरडे मोडण्यात आले आहे. या प्रकरणी 1639 गुन्हे दाखल असून 924 संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन कोटी 8 लाख 99 हजार 436 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. 
‘निर्भया’ पथकांची स्थापना
महिला व मुलींच्या छेडछाडीची प्रकरणेही जिल्ह्यात वाढीला लागली आहेत. या प्रकारांना आळा बसवण्यासाठी यावर्षी दि. 16 ऑगस्टपासून सर्व पोलीस ठाण्यांमध्ये निर्भया पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी छेडछाड प्रकरणी 10 हजार 35 कारवाया केल्या असून 5 हजार 727 जणांचे समुपदेशन करण्यात आले. जिल्ह्यात 936 ग्रामसुरक्षा दले  आणि 405 महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
आता नव्या वर्षातही गुन्हेगारांवरील कारवायांचा धडाका सुरुच ठेवण्याचा निर्धार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केला आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर न्यायालयांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्याचाही त्यांनी संकल्प केला आहे. जिल्ह्यात लँडमाफियाही बोकाळले असून त्यावर अंकुश ठेवण्यात येणार आहे. पोलिसांच्या मुलांसाठी सीबीएसई अभ्यासक्रमाची इंग्रजी शाळा गोळीबार मैदान येथे उभारण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: