Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारण प्रवेशाची घोषणा
ऐक्य समूह
Monday, January 01, 2018 AT 11:40 AM (IST)
Tags: na1
5चेन्नई, दि. 31 (वृत्तसंस्था) : दक्षिणेत चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा सुरू ठेवत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली. आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना, आपण स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपला राजकारण प्रवेश ही काळाची गरज आहे. आपला राजकीय पक्ष तमिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागा
लढवेल, असेही त्यांनी जाहीर केले. चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात रजनीकांत यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा केली. सध्या राज्यात लोकशाहीची अवस्था अत्यंत वाईट आहे. देशातील इतर राज्यांमधील लोक तमिळनाडूची थट्टा करत आहेत. त्यामुळे मी इतके दिवस राजकारणात का आलो नाही, याची खंत आता वाटते. सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली जनतेचे पैसे आणि जमिनी बळकावत आहेत. आपल्याला तमिळनाडूतील ही व्यवस्था बदलायची आहे. प्रामाणिकपणा, काम आणि विकास या तीन गोष्टी आपल्या नव्या राजकीय पक्षाचा मंत्र असेल. पक्ष स्थापन करून आगामी निवडणूक लढवणे कठीण असले तरी जनतेचा 100 टक्के पाठिंबा मिळेल, याची खात्री आहे. मी हे सत्तेसाठी आणि पैशांसाठी करत नाही. त्यासाठी हे करायचे असते तर वयाच्या 45 व्या वर्षी केले असते. मला अध्यात्मिक अधिष्ठान असलेले राजकारण करायचे आहे, असे रजनीकांत म्हणाले. दरम्यान, रजनीकांत यांच्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरी दुसर्‍या बाजूला टीकाही होत आहे.
    
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: