Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सरत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाचे स्वागत
ऐक्य समूह
Monday, January 01, 2018 AT 11:41 AM (IST)
Tags: lo1
5सातारा/कराड, दि. 31 : कटू गोड आठवणींचा संचय घेऊन आगामी वर्षात पर्दापण करताना नवीन संकल्प आणि नवीन ऊर्जा घेऊन पुढे जाण्याचा संकल्प करीत रविवारी रात्री जिल्हावासीयांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत आप्तेष्टांबरोबर जल्लोषी वातावरणात व्हावे, यासाठी अनेकांनी उत्कृष्ट नियोजनाचे बेत आखले होते. दरम्यान, गेल्या दोन ते तीन वर्षात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येत असून यावर्षीही सोशल मीडियांच्या शुभेच्छांची जोरदार ‘क्रेझ’ सर्वत्र पहावयास मिळाली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिह्यात ठिकठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
नवीन वर्षाचे स्वागत करताना नेहमीच नवे संकल्प केले जातात. जुन्या कटू आठवणींना उजाळा न देता नवीन वर्षात काय काय करायचे याची आखणी करत नवीन स्वप्ने रंगवली जातात. नवे वर्ष नव्या कल्पना घेऊनच येते. या सर्व कल्पना आणि स्वप्ने प्रत्यक्षात साकारली जावीत यासाठी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. गेल्या दोन, तीन वर्षात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जातोय. यंदाही मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या सोशल मीडियावरूनच नवीन वर्षाच्या स्वागताच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यासाठी वेगवेगळे संदेशही तयार करण्यात आले होते. काहींनी कॉपी पेस्ट करत आपल्याच मित्रांचे संदेश पुन्हा पुन्हा फॉरवर्ड करत शुभेच्छा देण्याच्या मार्गाचा अवलंब केला. सातारा शहरासह जिल्ह्यात अनेकांनी विधायक उपक्रम राबवून नवीन वर्षाचे स्वागत केले. काही ठिकाणी श्रमदान, परिसर स्वच्छता आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करून नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.
पोलिसांनी सातारा व परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.   
 शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस आणि तालुका पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम रविवारी दिवसभर आणि रात्रभरही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे, परवाने जवळ ठेवावेत. सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून वाहने चालवू नयेत. अंमली पदार्थाचे सेवन करून व मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत. आपल्या पाल्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असे आवाहनही पोलिसांनी केले होते. सातारा शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासमवेत चारभिंती परिसर, मोकळी मैदाने व अन्य सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून नवीन वर्षाचे स्वागत, जेवण व समारंभ, विधायक कार्यक्रमाचे आयोजन करून पोलीस दलास सहकार्य करावे व नवीन वर्षाप्रारंभी आपल्यावर होणारी कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी सातारा, कराड शहरासह परिसरात मोठी गर्दी झाली होती. यासाठी ढाबे आणि हॉटेल्स फुल्ल झाले होते. रात्री 12 च्या ठोक्याला फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि संदेश देवून नातेवाईक व मित्रांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आधुनिकीकरणामुळे एसएमएस व ईमेलद्वारे शुभेच्छा संदेश पाठविण्याचे प्रमाण वाढले असले तरी शुभेच्छापत्रांची क्रेझ आजही पहावयास मिळत आहे. नववर्षारंभानिमित्त बाजारपेठेत शुभेच्छापत्रे, डायर्‍या खरेदीला चांगली मागणी आहे. नवीन वर्ष सर्वार्थाने संपन्न जावे, यासाठी शुभेच्छांनी वर्षाची सुरवात करण्यात आली. नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्यासाठी शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. कराडमध्ये बहुतांशी प्रत्येक धाब्याबरोबरच प्रीतिसंगम घाट रात्री उशिरापर्यंत युवकांच्या गर्दीने फुलून गेला होता. अनेक जण जेवणासाठी तर अनेकांनी कुटुंबीयांसमवेत स्वादिष्ट भोजनाचा गुलाबी थंडीत आस्वाद घेतला.
प्रतिवर्षाप्रमाणे यावेळीही युवक-युवतींनी रस्त्यावर ‘हॅपी न्यू इअर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, बाय बाय 2017, वेल कम 2018’ यासारखी शुभेच्छा विविध रंगांच्या सहाय्याने रेखाटल्या. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या युवकांकडून हुल्लडबाजी होणार नाही. तसेच शांततेचा भंग होणार नाही, यादृष्टीने ठोस उपाययोजना म्हणून कराड शहरात अकरा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये पोपटभाई पंप, कार्वेनाका, ढेबेवाडी फाटा, कोल्हापूर नाका, सैदापूर कॅनॉल या प्रमुख ठिकाणांसह शहरात गर्दीच्या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात महिला पोलीस पथकाचाही समावेश होता. गेल्या दोन ते तीन वर्षात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यात अनेकांनी विधायक उपक्रम राबवून नवीन वर्षाचे उत्साही वातावरणात स्वागत केले. काही ठिकाणी श्रमदान, परिसर स्वच्छता आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करीत नववर्षाचे स्वागत केले. नागरिकांचा सेलिब्रेशन मूड लक्षात घेऊन यंदा काही ठिकाणी ढाब्यांसह हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांना खाण्याबरोबरच संगीत आणि खेळांच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. काहींनी तर वैयक्तिक पॅकेज जाहीर करुन त्यात स्टार्टर, जेवणासह फटाक्याची आतषबाजीचीही सोय केली होती. ग्रामीण भागात नववर्ष स्वागतासाठी हॉटेलमधील गर्दी आणि गोंगाट लक्षात घेता काहींनी खासगी ठिकाणी तर काहींनी शिवारात जावून जेवण तयार करुन घेत निसर्गात खाण्याचाही आनंद घेतला. 
‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झालेली असली तरी कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी
सातारा जिल्हा पोलीस दल अलर्ट होते. तब्बल 550 पोलिसांचा दोन दिवस खडा पहारा ठेवण्यात आला होता. तर जिल्ह्यात 50 ठिकाणी नाकाबंदी पॉइंट करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगीतले. 31 डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह असतो. जल्लोष साजरा करत असताना अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये, म्हणून जिल्हा पोलीस दलाच्यावतीने यंदा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: