Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आता मुस्लीम महिला हजला एकट्याने जातील
ऐक्य समूह
Monday, January 01, 2018 AT 11:42 AM (IST)
Tags: na2
प्रगतिशील भारतासाठी पंतप्रधान मोदींची युवकांना साद
5नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था) : तिहेरी तलाकविरोधातील विधेयक लोकसभेने संमत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता हज यात्रेवरून मुस्लीम महिलांच्या बाजूने उभे राहिले आहेत. यापुढे मुस्लीम महिलांना पुरुष पालकाविना (मेहरम) हज यात्रेवर जाता येईल. पुरुष आणि महिलांमधील हा भेदभाव आणि अन्याय सरकारने संपवल्याचे मोदींनी जाहीर केले. या वर्षाच्या अखेरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. देशातील युवकांनी आता ‘सकारात्मक भारता’कडून ‘प्रगतिशील भारता’च्या प्रवासात योगदान द्यावे, अशी सादही मोदींनी देशातील युवा वर्गाला घातली.  
केंद्र सरकारने पहिल्यांदाच किमान चार लोकांच्या समूहात 45 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना पुरुष पालकाशिवा (मेहरम) हज यात्रेवर जाण्यास मंजुरी दिली आहे, असे मोदींनी सांगितले. ज्या पुरुषाचा एखाद्या महिलेशी विवाह होऊ शकत नाही, जसे की, वडील, भाऊ आणि मुलगा यांना ‘मेहरम’ म्हटले जाते. आतापर्यंत महिला यात्रेकरूबरोबर मेहरमची आवश्यकता असायची.
मोदी म्हणाले, मला समजले की, एखाद्या मुस्लीम महिलेला हज यात्रेला जायचे असेल तर ती पुरुष पालकाशिवाय जाऊ शकत नाही. या भेदभावाचे मला आश्‍चर्य वाटले. मात्र, आता मुस्लीम महिला एकट्याने हज यात्रेवर जाऊ शकतील. आम्ही हा नियम बदलला असून यावर्षी 1300 मुस्लीम महिलांनी पुरूष सदस्याविना हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही हा भेदभाव कायम होता. असा अन्याय कसा होऊ शकतो. यामुळे मी अस्वस्थ होतो. अनेक मुस्लीम देशांमध्येही असे नाही. आम्ही ही परंपरा बंद केली आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाला मी सुचवले आहे की, एकट्याने अर्ज करणार्‍या सर्व महिलांना हज यात्रेसाठी पाठवले जावे. वास्तविक हज यात्रेला लॉटरी पद्धतीने पाठवले जाते. एकट्याने अर्ज करणार्‍या महिलांसाठी लॉटरी पद्धत बंद करुन त्यांना यात्रेसाठी जाण्यासाठी विशेष परवानगी द्यावी, अशी सूचना अल्पसंख्याक मंत्रालयाला दिली आहे.
येत्या प्रजासत्ताक दिनी आसियान देशातील 10 नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेबाबत देशात 4 जानेवारीपासून सर्वेक्षण केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. नव्या वर्षातही सरकार काळे धन, भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्ता आणि दहशतवाद याविरोधात कारवाई सुरूच ठेवणार आहे. देशाचा संपूर्ण विकास होईल या दृष्टीने नव्या वर्षात देशवासीयांनी मेहनत केली पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले. ‘सबका साथ, सबका विकास’चा पुनरुच्चार करत मोदींनी ‘बदल, प्रदर्शन आणि परिवर्तन’ हाच नव्या वर्षाचा मंत्र असायला हवा, असेही सांगितले. दरम्यान, केरळमधील सिवागिरी मठाच्या 85 व्या पर्यटन जल्लोषाचे मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्याची आठवण करुन दिली. तिहेरी तलाक विरोधी कायदा लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे. या कायद्याद्वारे आम्ही मुस्लीम महिलांना स्वातंत्र्य देत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लीम महिलांना ही अन्याय्य प्रथा सहन करावी लागत होती, असे मोदी म्हणाले.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: