Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘यळकोट’च्या जयघोषात खंडेराया-म्हाळसादेवी विवाहबद्ध
ऐक्य समूह
Monday, January 01, 2018 AT 11:48 AM (IST)
Tags: re2
5उंब्रज, दि. 31 : युगानूयुगं तारळी नदीच्या काठी भक्तांची आर्त हाक ऐकण्यासाठी उभ्या असलेल्या आणि कष्टकरी वर्गाचे दैवत असलेल्या श्री खंडेराया आणि म्हाळसादेवी यांचा दिमाखादार विवाहसोहळा रविवारी गोरजमुहूर्तावर सहा वाजण्याच्या सुमारास झाला. महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या सुमारे सहा लाख भाविकांनी भंडारा व खोबर्‍याची उधळण केल्याने पालनगरी पिवळीधमक झाली होती. एकाच वर्षात खंडेराया व म्हाळसादेवी यांच्या विवाहसोहळा दोन वेळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याचा दुर्मिळ योग भाविकांनी साधला. प्रशासन, यात्रा नियोजन कमिटी व ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने श्री खंडेरायांच्या दर्शनाचा लाभ मिळाल्याचा आनंद भाविकांच्या चेहर्‍यांवर दिसून आला.
भक्तांचा पाठीराखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री खंडोबास बोहल्यावर चढताना पाहण्यासाठी यावर्षीही अथांग जनसागर लोटला होता. या वर्षी भाविकांची संख्या सहा लाखाच्या आसपास होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व काही घडल्याने यात्रेमध्ये सुसूत्रता होती. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असूनही सर्वांना या विवाहसोहळ्याचा क्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवता आला.
खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध भागातून आलेले खंडोबाचे मानकरी, मानाच्या सासनकाठ्या, मानाचे गाडे, पालखी यासह देवस्थानच्या रथातून मानकर्‍यांना रथातून घेऊन निघालेली शाही मिरवणूक लक्ष वेधून घेत होती. दुपारी 2.45 च्या सुमारास देवस्थानचे मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी 3.30 च्या सुमारास देवराज पाटील देवाला पोटास बांधून अंधार दरवाजाजवळ आले. तेथे ते रथात विराजमान झाले. तेथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला.
फुलांनी सजवलेल्या छत्र्या, चोपदाराचा घोडा, सासनकाठ्या, पालखी, मानाचे गाडे व त्या पाठोपाठ राजेशाही थाटात श्री खंडोबा व म्हाळसा यांना रथातून घेवून निघालेले मानकरी, अशी भव्यदिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा व खोबर्‍याची उधळण करुन ‘यळकोट यळकोट जयमल्हार’चा घोष करत देवाचे दर्शन घेतले. मुख्य मिरवण्ाुकीला प्रारंभ होताच भाविकांची तुफान गर्दी होते. मात्र, यावर्षी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी यात्रापूर्व नियोजन बैठकीत केलेल्या सूचनेनुसार मिरवण्ूक मार्गावरील पुलाला वाळवंटात जाण्यासाठी समांतर पूल साकारला होता. या
पुलावरून भाविकांना सोडले जात होते. त्यामुळे मुख्य चौकात तारळी पुलावरून व काशिळ मार्गे होणारी गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत
झाली होती. 
तारळी नदीचे दक्षिण पात्र भंडारा, खोबरे उधळण्यासाठी भाविकांनी खचाखच भरले होते. पालनगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाहसोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा, खोबर्‍याच्या उधळणीने पिवळाधमक झाला होता. मिरवणूक तारळी नदीपात्रात येताच भाविक भंडारा, खोबर्‍याची उधळण करत खंडोबा व म्हाळसा यांचा जयजयकार करत होते. तारळी नदीचे दक्षिण पात्र भंडार्‍याने  पिवळे धमक झाले होते. सायंकाळी 6 च्या सुमारास मिरवणूक तारळी नदीपात्रातून मारूती मंदिरमार्गे बोहल्याजवळ आली. यावेळी खंडोबाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले. मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढवले आणि पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने खंडोबा व म्हाळसा यांचा विवाहसोहळा थाटात झाला. विवाह सोहळयास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे समाधान प्रत्येक भाविकाच्या चेहर्‍यावर दिसत होते.
जिल्हा प्रशासनाने गतवर्षीपासून मंदिर परिसरातील मुख्य चौक पूर्णपणे रिकामा ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे चौकाने एक प्रकारे मोकळा श्‍वास घेतला, असेच म्हणावे लागेल. मिरवणुकीवेळी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावण्याचा केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. यात्रापूर्व बैठकीतील सूचनांनुसार प्रशासनाने यावर्षी सुधारणा केल्याने पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. काशिळ-पाल मार्गावरून येणार्‍या भाविकांना थेट
वाळवंटात पाठवले जात होते तर हरपाळवाडी मार्गावरून व मंदिरातून येणार्‍या भाविकांना नदीच्या उत्तर वाळवंटात साकव पुलावरून
सोडले जात होते. वाळवंटात गेलेला भाविक त्या दिशेने परत मंदिराकडे येणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली होती. तारळी पूलही
बहुतांशी रिकामा ठेवला होता. या पुलावरून भाविकांना
थेट वाळवंटात सोडले जात होते. मुख्य चौकात गर्दीवर नियंत्रण
ठेवण्यात यश आल्याने पोलीस व जिल्हा प्रशासनाने सुटकेचा
निःश्‍वास टाकला.  
यात्रा शांततेत झाल्याबद्दल देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, उंब्रजचे पोलीस निरीक्षक जोतिराम गुजवंटे यांनी भाविकांचे आभार मानले.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून आलेल्या भाविकांना श्री खंडोबाचे दर्शन विनासायास मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने केलेल्या  शिस्तबध्द दर्शनबारीचे स्वागत होत होते. तारळी नदीचे दक्षिण पात्र भाविकांनी खचाखच भरले होते तर उत्तर पात्र दुकानांबरोबर भाविकांनी तुडुंब भरले होते. लहानमोठे पाळणे, सिनेमाचे तंबू, खेळण्यांची व मेवा-मिठाईची दुकाने गर्दीने गजबजली होती. वाघ्या-मुरळींचे जागरणाचे कार्यक्रम नदीच्या उत्तर व दक्षिण पात्रात सुरू होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: