Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अखेर नितीन पटेलांना अर्थ मंत्रालय
ऐक्य समूह
Monday, January 01, 2018 AT 11:43 AM (IST)
Tags: mn2
बंड शमवण्यात गुजरात भाजपला यश
5अहमदाबाद, दि. 31 (वृत्तसंस्था) : गुजरातच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद देऊनही योग्य खाते न दिल्यावरून स्वाभिमान दुखावल्याचे कारण सांगत बंडाची भाषा करणार्‍या नितीन पटेलांना शांत करण्यात भाजपला यश आले आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या फोननंतर पटेल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवून त्यांना खूश करण्यात आले आहे. केवळ उपमुख्यमंत्रिपदावर समाधान न मानता चांगले खाते मिळण्याची  अपेक्षा पूर्ण न झाल्याने पटेल यांनी कार्यभार स्वीकारला नव्हता. त्यांना पाटीदार पटेल समाजानेही पाठिंबा देत, सन्मान राखला जाणार नसेल तर पक्षातून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते.
गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर सौरभ पटेल यांना अर्थ खाते देण्यात आले होते. आधीच्या मंत्रिमंडळात पटेल यांच्याकडे अर्थ व नगरविकास ही खाती होती. मात्र, नव्या मंत्रिमंडळात त्यांना रस्ते व बांधकाम, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, नर्मदा प्रकल्प आदी कमी महत्त्वाची खाती देण्यात आली होती. त्यामुळे नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्यास नकार दिल्याने भाजपपुढे पेच निर्माण झाला होता. पटेल यांच्यामुळे पक्षात बंडाळी माजण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची मर्जी राखण्यासाठी सौरभ पटेल यांच्याकडील अर्थ खाते पटेल यांच्याकडे सोपवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीन पटेल यांना फोन केल्यानंतर अवघ्या चार तासातच त्यांची नाराजी दूर झाली. पटेल यांनी रविवारी दुपारीच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यामुळे नितीन पटेल हे आता उपमुख्यमंत्रिपदाबरोबर अर्थ खातेही सांभाळतील. या खातेबदलाची माहिती राज्यपालांना देण्यात आली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: