Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद
ऐक्य समूह
Monday, January 01, 2018 AT 11:37 AM (IST)
Tags: mn1
सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रावर हल्ला; तीन दहशतवादी ठार
5नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था) : संपूर्ण देश सरत्या वर्षाचा निरोप  घेऊन नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत असतानाच जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या छावण्यांवर हल्ला होऊ शकतो, असा सतर्कतेचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतरही हा हल्ला झाला. त्यामुळे सुरक्षा दलांच्या छावण्यांची सुरक्षा व्यवस्था बेफिकीर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एकीकडे दहशतवादी हल्ला झाला असताना दुसरीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने नौशेरा व राजौरी सेक्टरमध्ये गेलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले.
दरम्यान, सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकस्थित दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या दहशतवादी संघटनेचा कमांडर नूर मोहम्मद तंत्रेय हा गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ठार झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला ‘जैश’ने घडवून आणला.
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील लठपोरा येथे  सीआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात 185 बटालियनचे मुख्यालयदेखील आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दोन ते तीन दहशतवाद्यांनी प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात प्रवेश केला. या दहशतवाद्यांकडे ग्रेनेड लाँचर्स व अन्य स्वयंचलित शस्त्रास्त्रे होती. दहशतवाद्यांनी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश केल्यावर ग्रेनेडस् फेकत बेछूट गोळीबार सुरू केला. केंद्राच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले.   
त्यातील एकाला जागीच वीरमरण आले तर चार जवानांना रुग्णालयात दाखल केल्यावर वीरमरण आले. या चकमकीची माहिती समजताच भारतीय लष्कराह आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी पाठवण्यात आली. त्यानंतर भारतीय सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे 14 तास झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. परिसरात आणखी एक दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलांची शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या हल्ल्याचे उरी येथे गेल्या वर्षी लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी साम्य आहे. उरी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांच्या तळावर झालेला हा मोठा हल्ला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. त्यामुळे पाकिस्तानला  धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराच्या कमांडोेंनी पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत घुसून रुखचकरी परिसरात तीन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले होते. त्याच दरम्यान सुरक्षा दलांच्या कारवाईत काश्मीर खोर्‍यात ‘जैश’चा कमांडर नूर मोहम्मद तंत्रेय याच्यासह दोन दहशतवादी ठार झाले होते. सुरक्षा दलांच्या या कारवाईचा बदला घेण्यासाठी सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर ‘जैश’कडून दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून या संघटनेच्या प्रवक्त्याने याबाबतची माहिती जम्मू-काश्मीरमधील स्थानिक प्रसारमाध्यमांना दिली.
सतर्कतेचा इशार्‍यानंतरही हल्ला
दरम्यान, सुरक्षा दलांच्या छावण्यांवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने दोन ते तीन दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानंतरही सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर हा हल्ला झाला. त्यामुळे गुप्तचरांनी इशारा देऊनही सुरक्षा यंत्रणा गाफील राहिल्याचे समोर आले आहे.
सीमेवर दोन जवान शहीद
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने काश्मीरच्या नौशेरा व राजौरी सेक्टरमध्ये रविवारी केलेल्या गोळीबारात पंजाब रेजिमेंटचे जगसीरसिंग (वय 32) यांच्यासह दोन जवान शहीद झाले. जगसीर हे नौशेरा सेक्टरमध्ये रुमलीधारा येथे नियंत्रण रेषेवरील चौकीत तैनात होते. रविवारी पहाटे 3.50 च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याच्या स्नायपर्सनी केलेल्या गोळीबारात सिंग यांच्यासह दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानी लष्कराच्या बलुच रेजिमेंटच्या स्नायपर्सनी हा गोळीबार केला. सिंग हे पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील लोहगड ठकरनवाला गावचे रहिवासी होते. पाकिस्तानच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, रुग्णालयात नेताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. विशेष म्हणजे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी कालच राजौरी येथे नियंत्रण रेषेवर भेट देऊन तेथील सुरक्षा तयारीचा आढावा घेतला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: