Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सलूनचालकाने मामा-भाच्याला भोसकले
ऐक्य समूह
Monday, January 01, 2018 AT 11:47 AM (IST)
Tags: lo5
कोंडवे येथील घटना; तिघेही जखमी
5सातारा, दि. 31 : कोंडवे, ता. सातारा येथे रविवारी दुपारी सलूनचालकाशी झालेल्या किरकोळ वादावादीतून तिघांनी एकमेकांना पेव्हर ब्लॉक आणि कात्रीने मारल्यामुळे तिघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये सलूनचालक अनिल केशव जाधव (वय 45) आणि दिगंबर हणमंतराव गायकवाड (वय 35) व सागर हिंदुराव भिसे (वय 22) या मामा-भाच्याचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अनिल जाधव याचे कोंडवे येथे केशकर्तनालय आहे. तो रविवारी दुकानात काम करत असताना दुपारी चारच्या सुमारास दिगंबर गायकवाड आणि सागर भिसे हे तेथे आले. त्यांनी जाधव यास काही तरी विचारले. मात्र, जाधव याने काहीच उत्तर न दिल्याने त्या दोघांपैकी एकाने संतापून जाधव याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारला. त्यानंतर जाधव यानेही रागाच्या भरात सलूनमधील कात्री दिगंबर याच्या पोटात खुपसली. त्यानंतर तीच कात्री सागरलाही मारली. त्यामध्ये सागर किरकोळ जखमी  झाला असून दिगंबर गंभीर आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली. त्यानंतर तिघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यास देण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांनी कर्मचार्‍यांसमवेत जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: