Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आर्थिक विकासाचा वेग मंदावला
ऐक्य समूह
Saturday, December 30, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: na2
केंद्र सरकारची संसदेत कबुली
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : 2016-17 या वर्षात अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा वेग मंदावल्याची कबुली केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत दिली. 2015-16 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वृद्धी दर 8 टक्के होता. तो 2016-17 मध्ये 7.1 टक्के झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात सांगितले. अर्थव्यवस्थेची गती मंदावण्यास नोटाबंदी व जीएसटी अंमलबजावणी कारणीभूत असल्याची टीका विरोधक करत आहेत. मात्र, जेटली यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. अर्थव्यवस्थेची गती मंदा-वल्याचे प्रतिबिंब उद्योग आणि सेवाक्षेत्रात उमटले असून आर्थिक विकास मंदावण्यास   रचनात्मक, बाह्य आणि आर्थिक घटक कारणीभूत असल्याचे जेटली यांनी सांगितले. 2016 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती, सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत कमी झालेली गुंतवणूक, उद्योग क्षेत्रावरील दबाव आणि उत्पादन क्षेत्रातील पतपुरवठ्यातील घट या कारणांमुळे 2016-17 या वर्षात देशाची आर्थिक विकासाची गती मंदावली. अर्थव्यवस्थेची गती मंदावण्यास अनेक घटक कारणीभूत असतात, असा दावा त्यांनी केला.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या माहितीनुसार, सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वृद्धी दर 2014-15 मध्ये 7.5 टक्के, 2015-16 मध्ये 8 टक्के, 2016-17 मध्ये 7.1 टक्के, 2017-18 च्या पहिल्या तिमाहीत 5.7 टक्के आणि दुसर्‍या तिमाहीत 6.3 टक्के होता, असे जेटली यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेची गती 2016-17 मध्ये मंदावली असली तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2016 मध्ये जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरली तर 2017 मध्ये सर्वात वेगाने विकास होणारी दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली, असा दावा जेटलींनी केला. अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली असून उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्र, शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, थेट विदेशी गुंतवणुकीत सुधारणा आणि वस्त्रोद्योगासाठी स्पेशल पॅकेज, ही पावले उचलण्यात आली आहेत. 2017-18 च्या अर्थसंकल्पातही अनेक सुधारणा जाहीर कऱण्यात आल्या. त्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, परवडणार्‍या घरांच्या योजनांना पायाभूत सुविधांचा दर्जा, महामार्गांचे बांधकाम आणि सागरी मार्गांची जोडणी, यांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: