Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुंबईत पबमध्ये अग्नितांडव
ऐक्य समूह
Saturday, December 30, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: mn1
14 जणांचा मृत्यू; चौकशीचे आदेश; पाच अधिकारी निलंबित
5मुंबई, दि. 29 (प्रतिनिधी) : मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील ‘हॉटेल मोजो’ व ‘वन अबोव्ह’ या पबमध्ये गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून बेकायदेशीर पबकडे डोळेझाक करणार्‍या महापालिकेच्या पाच अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
मध्य मुंबईतील आजारी कापड गिरण्यांच्या जागांवर मोठमोठे मॉल उभे राहिले आहेत. अनेक चकचकीत रेस्टॉरंट व उच्चभ्रू पब तेथे सुरू झाले असून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामेही तेथे झाली आहेत. अशाच एका पबला गुरुवारी मध्यरात्री आग लागून 14 निष्पाप लोकांचा बळी गेला. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. ‘वन अबोव्ह’ या पबला गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने काही कळायच्या आत ही आग शेजारच्या हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अँड पबपर्यंत पसरली. टेरेसवर असणार्‍या या पबमधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग असल्याने लोकांनी दिसेल तिकडे धाव घेतली. काहींनी तेथील वॉशरूममध्ये आसरा घेतला; परंतु काही कळायच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. काहींचा आगीत होरपळून तर बाथरूममध्ये आसरा घेतलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी तिथे 200 हून अधिक जण उपस्थित होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, या आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात असलेल्या ईटी नाऊ, मिरर नाऊ, झूम आणि टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणांवरही परिणाम झाला. शेजारच्या इमारतीतील कार्यालये आज बंद ठेवण्यात आली होती.   
या कंपाऊंडमध्ये अंदाजे 42 रेस्टॉरंट आणि पब आहेत.
अमेरिकास्थित दोन भावांचा मृत्यू
दरम्यान, या अग्नितांडवात अमेरिकास्थित दोन भावंडांचा करुण अंत झाला. आग लागली तेव्हा ‘वन अबव्ह’ पबमधून बाहेर पडलेल्या या दोन भावंडांनी अडकलेल्या आपल्या आत्याला वाचवण्यासाठी पुन्हा पबमध्ये धाव घेतली आणि आत्यासह या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. धैर्य ललानी (वय 26) आणि विश्‍व ललानी (वय 23) अशी त्यांची नावे आहेत. पबमधील बाथरूमजवळ या दोघांचे मृतदेह आढळून आले. या ठिकाणी कुठलीही खिडकी किंवा बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. त्याचबरोबर या दोन भावांची आत्या प्रमिला यांचा मृतदेहही आढळून आला. धैर्य आणि विश्‍व हे अमेरिकेत स्थायिक होते. ते दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत आपल्या नातेवाइकाच्या लग्नासाठी आले होते. गुरुवारी रात्री प्रमिला यांनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. पबला आग लागल्यानंतर दोघा भावांनी बाहेर धाव घेतली. मात्र, आत्याला शोधण्यासाठी ते पुन्हा पबमध्ये गेले. तेथेच त्यांचा करुण अंत झाला.
पबच्या कर्मचार्‍यांचे पलायन
या अग्नितांडवात अडकलेल्यांना मदत करण्याऐवजी पबचे मॅनेजर आणि कर्मचार्‍यांनी प्रथम स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तेथून पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेने या पबविरोधात तीन वेळा कारवाई केली होती. या पबने ऑक्टोबर 2016 मध्ये अग्निसुरक्षा व बांधकाम परवानगी मिळवली होती. त्यानंतर नियमांचा भंग केल्याबद्दल महापालिकेने पबवर 27 मे रोजी कारवाई केली होती. त्यानंतर पालिकेने पबला 4 ऑगस्ट, 22 सप्टेंबर आणि 27 ऑक्टोबरला नोटिसा बजावल्या होत्या. 2 ऑगस्टला तेथील अतिक्रमण पाडण्यात आले होते. त्यानंतरही पबच्या मालकांनी नियमभंग केला होता.
पबमालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
हॉटेल ‘वन अबोव्ह’चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व सी ग्रेड हॉस्पिटॅलिटी अँड एन्टरटेन्मेंट एलएलपी या कंपनीचे मालक आहेत. मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याचे समजते.
पाच अधिकारी निलंबित
कमला मिल अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेच्या पाच अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. मधुकर शेलार (पदनिर्देशित अधिकारी), धनराज शिंदे (कनिष्ठ अभियंता), महाले (उपअभियंता), पडगिरे (वैद्यकीय आरोग्य अधिकारी) व एस. एस. शिंदे (अग्निशमन अधिकारी) अशी त्यांची नावे आहेत. जी साऊथ वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका अधिकार्‍यांनी या पबच्या अनधिकृत कामांवर कोणतीही कारवाई केली नव्हती.
कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
दरम्यान, कमला मिल्स आवारातील अग्नितांडवाची सखोल चौकशी करण्यास मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सांगण्यात आले आहे. या प्रकरणी जे कोणी अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी कमला मिल्स आवारातील घटनास्थळाला भेट दिली. दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले. देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल्स आवारातील घटनास्थळाला भेट देऊन वरिष्ठ अधिकार्‍यांकडून घटनेची माहिती घेतली. हॉटेलचे मालक, संचालक आणि या प्रकरणी जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
राज्यापालांना तीव्र दुःख
कमला मिल्स कम्पाउंडमधील भीषण आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या निरपराध व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना लवकर आराम पडो, अशी प्रार्थना करत आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
सीबीआय चौकशीची विखे यांची मागणी
या अग्नितांडवातील मृत्यू हे मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे बळी आहेत. मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीवर उभे आहे. या दुर्घटनेची पालिका आयुक्तांमार्फत नव्हे तर सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांबद्दल विखे-पाटील यांनी शोकभावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, पोलिसांनी हॉटेलमालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हॉटेलमालकांसोबत महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांपासून आयुक्तांपर्यंत सारेच दोषी आहेत. या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झाले होते. बांधकामामध्ये आगीला पोषक असे साहित्य मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले होते. आग लागल्यास ती विझविण्याची सक्षम यंत्रणा तर सोडाच, पण बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्गदेखील या ठिकाणी उपलब्ध नव्हता. यासाठी केवळ हॉटेल मालकच नव्हे तर मुंबई मनपादेखील तेवढीच जबाबदार आहे. या अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रार करण्यात आली होती तरीही त्याकडे दुर्लक्ष करून 14 जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याबद्दल मनपा अधिकार्‍यांवरसुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत.
या दुर्घटनेला महापालिकाच जबाबदार असल्याने आयुक्तांमार्फत चौकशी करणे निव्वळ मलमपट्टी ठरेल. त्यामुळे आयुक्तांमार्फत चौकशी आम्हाला मान्य नसून मागील दोन वर्षांत मुंबईत इमारती कोसळून आणि आगी लागून अनेकांचा मृत्यू झाल्या प्रकरणांची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली.
हेमामालिनींचे वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान, या अग्नितांडवाला मुंबईची अफाट लोकसंख्या कारणीभूत असल्याचे वक्तव्य भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनी पत्रकारांशी बोलताना केले. मुंबईची लोकसंख्या प्रचंड आहे. जेव्हा मुंबई संपते, तेव्हा दुसरे शहर सुरू होते आणि शहर वाढतच राहते, असे त्या म्हणाल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: