Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ढाकणी ग्रामपंचायत आगीच्या भक्ष्यस्थानी; पावणे पाच लाखांचे नुकसान
ऐक्य समूह
Saturday, December 30, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: re2
5म्हसवड, दि. 29 : ढाकणी, ता. माण ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले. या आगीत सुमारे पावणे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार उपसरपंच कृष्णांत खाडे यांनी पोलिसात दाखल केली आहे.
याबाबतची घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती, अशी माण तालुक्यातील ढाकणी हे सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडून हे गाव बेदखल आहे. वीज कंपनीच्या कार्यालयाकडे नागरिकांनी अनेक वेळा विजेचा दाब कमी- अधिक होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी गावात गुरुवार, दि.28 रोजी रात्री अचानक विजेचा दाब कमी अधिक झाल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शॉर्ट-सर्किट होवून आग लागली. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे व फर्निचर जळून खाक झाले आहे तर गावातील काहीचे टी.व्ही. जळले आहेत. या आगीत ग्राम-पंचायत कार्यालयातील कॉम्प्युटर संच, एक वेब कॅमेरा, एक टेबल, जॉब कार्ड, त्याची नोंदवही, नरेगा मस्टर एम. बी, नमुना क्रमांक एक फाईल, 2 ते10 नमुना नं. 8 कॉम्प्युटर प्रिंट, एक अर्ज फाईल, बी. बी. एन. एल. ब्रॉड बँड नवीन कनेक्शन संच पूर्ण, फाईल, वर्कऑर्डर फाईल, प्रधानमंत्री आवास योजना  रजि.फाईल (प्रस्ताव) तसेच कार्यालयातील कपाटे, खुर्च्या, इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती समजताच माणच्या तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी जे. डी. शेलार, सरपंच रूपाली खाडे, ग्रामविस्तार अधिकारी मोरे, सर्कल अहिवळे, ग्रामसेवक महेश ताम्हाणे, सपोनि. मालोजीराव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. बीट हवालदार ए. एम. कांबळे, एस. एस. सानप, नितीन धुमाळ, हवालदार खाडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबत सपोनि. मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार ए. एम. कांबळे तपास करत आहेत.
ढाकणी, ता. माण ग्रामपंचायत कार्यालय हे शाळेच्या जवळ आहे. आगीची घटना रात्रीच्या वेळी घडली. तसेच आसपास घरे नसल्याने या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने इतर कुठलीही हानी झाली नाही. संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडून देखील वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: