Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इस्रो करणार 31 उपग्रहांचे एकाच मोहिमेत प्रक्षेपण
ऐक्य समूह
Saturday, December 30, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: mn2
5बंगलोर, दि. 29 (वृत्तसंस्था) : एकाच मोहिमेत 104 उपग्रहांचे प्रक्षेपण करून जागतिक विक्रम करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अशाच प्रकारच्या आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. आता 10 जानेवारी रोजी इस्रो एकाच मोहिमेत 31 उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. त्यामध्ये ‘कॅट्रोसॅट-2’ या स्वदेशी बनावटीच्या उपग्रहांच्या मालिकेतील एका उपग्रहाचा समावेश असणार आहे.
इस्रोने ऑगस्टमध्ये ‘आयआरएनएसएस-1एच’ या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, या अपयशामुळे इस्रोचे शास्त्रज्ञ खचून गेलेले नाहीत. त्यांनी आणखी एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत एकाच वेळी 31 उपग्रह अंतराळ कक्षेत सोडण्यात येणार आहेत. 10 जानेवारी रोजी हे प्रक्षेपण करण्यात येणार असून या मोहिमेत ‘कॅट्रोसॅट-2  या मालिकेतील मुख्य उपग्रह असेल. या मोहिमेसंदर्भात इस्रोची आढावा समिती लवकरच बैठक घेणार असून त्यामध्ये या मोहिमेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून ‘पीएसएलव्ही-40’ या प्रक्षेपकाच्या साह्याने या उपग्रहांचे प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेत फिनलंड आणि अमेरिकेचे 28 नॅनो उपग्रह, भारताचा एक लघु व एक नॅनो उपग्रह आणि कॅट्रोसॅट हा मुख्य उपग्रह,  असे एकूण 31 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. इस्रोने ऑगस्टमध्ये ‘पीएसएलव्ही-सी39’ या प्रक्षेपकाच्या साह्याने ‘आयआरएनएसएस-1एच’ या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रक्षेपकातील तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम फसली होती. आता 10 जानेवारी रोजी ‘कॅट्रोसॅट-2’ मालिकेतील तिसर्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: