Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘बिटकॉइन’सारख्या आभासी चलनांपासून सावधान
ऐक्य समूह
Saturday, December 30, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: na3
केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा गुंतवणूकदारांना इशारा
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : बिटकॉइनसारख्या आभासी चलनांपासून सावध राहण्याचा इशारा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील गुंतवणूकदारांना दिला आहे. ही आभासी चलने वैध नसून त्यांना कायद्याचे कोणतेही संरक्षण नाही. ही आभासी चलने म्हणजे फसव्या योजना असून त्यामध्ये गुंतवणूक करू नये, असे आवाहन अर्थ मंत्रालयाने केले आहे.
मोठ्या परताव्याचे आमिष देणार्‍या फसव्या योजनांमधील गुंतवणुकीसारखा धोका बिटकॉइन आणि तत्सम आभासी चलनांमधील गुंतवणुकीस आहे. या चलनांमधील गुंतवणुकीपासून मिळणारे लाभ म्हणजे केवळ बुडबुडा असून तो कधी फुटेल, हे सांगता येणार नाही. त्यातून आपला मेहनतीने मिळवलेला पैसा गमावण्याचा धोका आहे. त्यामुळे ग्राहकांनी आभासी चलनांच्या योजनांपासून सावधगिरी बाळगावी, असे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ही आभासी चलने डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन केली जातात. त्यामुळे त्यांना हॅकिंगचा धोका आहे. त्यातून पासवर्ड गमावणे, मालवेअरचा हल्ला, असे धोके संभवतात. त्यामुळे ग्राहक आपली मेहनतीची कमाई सहज गमावू शकतात. बिटकॉइन सारख्या आभासी चलनांच्या किमतीत भारतात आणि जागतिक स्तरावर अद्भुत वाढ होत असली तरी या आभासी चलनांना स्वाभाविक मूल्य नाही आणि त्यांना कोणत्याही स्वरूपाच्या मालमत्तेचे पाठबळ नाही. बिटकॉइन आणि तत्सम चलनांच्या किमती केवळ तर्काधिष्ठित असून त्या वेगाने वाढू शकतात आणि त्याच वेगाने कोसळू शकतात, असेही या निवेदनात म्हटले आहे.
आभासी चलनांबाबत रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी गुंतवणूकदारांना सावध केले आहे. या आभासी चलनांना जगातील कोणत्याही सरकारांची मान्यता नसून ती वैध चलने नाहीत. या चलनांना भौतिक आधार नसून या चलनांच्या व्यवहारापासून होणार्‍या धोक्यांचा विचार करावा, असे आवाहनही अर्थ मंत्रालयाने केले आहे.
तत्पूर्वी, या संदर्भात अर्थ राज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी शुक्रवारी लोकसभेत निवेदन केले. बिटकॉइन व तत्सम आभासी चलनांबाबत जागतिक स्तरावर असलेली कायदेशीर रचना आणि नियंत्रणाची चौकट यांचा अभ्यास करण्यासाठी अर्थ व्यवहार विभागांतर्गत एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला असून तो विचाराधीन आहे, असे राधाकृष्णन यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: