Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शहरांसाठी ‘स्वच्छ वॉर्ड’ स्पर्धा
ऐक्य समूह
Friday, December 29, 2017 AT 11:10 AM (IST)
Tags: mn3
विजेत्या प्रभागांना लाखोंची बक्षिसे
5मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) :राज्यातील शहरांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा व स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रमांनुसार शहरांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज केली. पुढील वर्षी 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार आहे.
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या शहरांच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ची आढावा बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेची आणि अमृत शहरे व अमृत योजनेत सहभागी नसलेल्या शहरांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची घोषणा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, मुख्याधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून स्वच्छता अभियानाच्या प्रगतीची माहिती घेतली.
येत्या 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार आहे. मार्च महिन्यात त्रयस्थ संस्थेमार्फत या स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार असून यातील पहिल्या तीन वॉर्डना बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘अ’ व ‘ब’ वर्ग महापालिकांमधील पहिल्या तीन वॉर्डना अनुक्रमे 50 लाख, 30 लाख व 20 लाख रुपये तर ‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिकांमधील वॉर्डना अनुक्रमे 30 लाख, 20 लाख व 15 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘अ’वर्ग नगरपरिषदांसाठी अनुक्रमे 30 लाख, 20 लाख व 15 लाख तर ‘ब’ वर्ग नगरपरिषदांसाठी 20 लाख, 15 लाख, 10 लाख आणि ‘क’ वर्ग नगरपरिषदांसाठी अनुक्रमे 15 लाख, 10 लाख व 5 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शहरांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन गुणानुक्रमात आलेल्या राज्यातील शहरांना 20 कोटी तर 4 ते 10 क्रमांकामध्ये आलेल्या शहरांना 15 कोटी देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट नसलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्‍चिम विभागीय गुणानुक्रमात येणार्‍यांसाठीही बक्षिसे जाहीर करण्यात आली असून यामध्ये पहिल्या 3 क्रमांकात येणार्‍या शहरांना 15 कोटी, 4 ते 10 क्रमांकामध्ये येणार्‍यांना 10 कोटी तर 11 ते 50 क्रमांकांमधील शहरांना 5 कोटी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
केंद्र शासनाने घोषित केलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत यावर्षी राज्यातील शहरांचा गुणानुक्रम वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. अमृत योजनेतील जास्तीत जास्त शहरे यंदा पहिल्या शंभर क्रमांकामध्ये यावीत यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा. स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिक्रियांना महत्त्व असल्याने यासंबंधीचे अ‍ॅप जास्तीत जास्त लोकांनी वापरून आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात यासाठीही प्रयत्न करावेत. स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यासाठी बैठका घेण्यात याव्यात, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वच्छतेत चांगली प्रगती केली आहे; परंतु अद्यापही स्वच्छ शहरांच्या गुणानुक्रमात आघाडी
घेण्याची संधी असून त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये चांगले गुणानुक्रम न मिळविणार्‍या,
शहरातील 80 टक्के कचरा विलगीकरण न करणार्‍या आणि कचर्‍याचे कंपोस्ट खत तयार न करणार्‍या शहरांना राज्य शासनामार्फत
अतिरिक्त अनुदान देण्यात येणार नाही. पुढील काळात शहरांच्या कामगिरीनुसारच अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण अमृत शहरे व अमृत योजनेत समाविष्ट नसलेली शहरे अशा दोन गटात होणार आहे. अमृत शहरांचे गुणानुक्रम देशातील 500 शहरांमधून होणार असून अमृत योजनेत नसलेल्या शहरांची विभागणी पाच विभागांमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा समावेश पश्‍चिम विभागात करण्यात आला असून यामध्ये 1015 शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेतील विजेत्या शहरांना केंद्राकडूनही बक्षिसे मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त शहरे पहिल्या 100 क्रमांकांमध्ये यावीत यासाठी
लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. 4 जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू होणार आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: