Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तिसरीतील बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
ऐक्य समूह
Friday, December 29, 2017 AT 11:06 AM (IST)
Tags: lo2
परप्रांतीयाला मनसेच्या पदाधिकार्‍यांनी पकडले
5सातारा, दि. 28 : तिसरीमध्ये शिकणार्‍या बालिकेवर (वय 8) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न कोडोली परिसरात झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अतिप्रसंग करणारी संशयित व्यक्ती परप्रांतीय आहे. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला  मनसेच्या पदाधिकार्‍यांनी पकडून पोलिसांकडे दिले आहे.
राजेश नायक (सध्या रा.कोडोली, मूळ रा.बिहार) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार पालक हे एमआयडीसी येथे कामाला आहे. मूळचे वाई तालुक्यातील आहेत. कामानिमित्त सध्या ते कोडोली येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्य करत आहेत. बुधवार, दि. 27 रोजी तक्रारदार हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास घराबाहेर खुर्चीवर बसले होते. त्यावेळी तक्रारदार यांची 8 वर्षाची मुलगी बिल्िंडगच्या गाळ्यामध्ये अभ्यास करत बसली होती. त्यावेळी संशयित राजेश नायक हा तक्रारदार यांची मुलगी अभ्यास करत असलेल्या ठिकाणी गेला. काही कालावधी गेल्यानंतरही संशयित बराच वेळ त्या ठिकाणी असल्याने तक्रारदार यांनी घटनास्थळी जावून पाहिले असता संशयित मुलीशी गैरवर्तन करत होता. ती घटना पाहिल्यानंतर संशयित राजेश नायक याने घाबरून तक्रारदार यांना हिसका मारून तेथून पलायन केले. गैरप्रकार करण्याचा प्रयत्न झाल्याने पीडित मुलगी कमालीची घाबरली होती. पीडित मुलीला घरी नेल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या एका मित्राला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही संशयिताच्या खोलीमध्ये जावून मुलीबरोबर गैरकृत्य केल्या प्रकरणाचा जाब विचारू लागले. त्यानंतर तो तेथूनही पळून जावू लागला.   
अखेर परिसरातील नागरिकांनी संशयिताला पकडले व शहर पोलीस ठाण्यात आणले.
सर्व परप्रांतीयांची माहिती घ्यावी
जिल्ह्यात राहणा़र्‍या प्रत्येक परप्रांतीयांची माहिती पोलिसांकडे असायला हवी. मात्र अशी माहिती पोलिसांकडे नाही. जिल्ह्यात  मोठ्या संख्येने परप्रांतीय राहतात. त्यांच्याकडून आता लैंगिक गुन्हे घडू लागले आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी सर्व परप्रांतीयांची माहिती घ्यावी. एक आठवड्यानंतर सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहे, असा इशारा मनसेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला.
ही घटना घडल्यानंतर मनसेचे युवराज पवार, शहराध्यक्ष राहुल पवार, अझर शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून संशयितावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गुन्हा दाखल होईपर्यंत ते पोलीस ठाण्यात थांबून राहिले होते.  यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, धैर्यशील पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: