Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
क्षेपणास्त्रविरोधी स्वनातीत क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
ऐक्य समूह
Friday, December 29, 2017 AT 11:04 AM (IST)
Tags: mn2
5बालासोर, दि. 28 (वृत्तसंस्था) : हवाई संरक्षणासाठी भारताने क्षेपणास्त्रविरोधी अत्या-धुनिक स्वनातीत क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी केली. त्यामुळे भारताने संरक्षण क्षेत्रात आणखी एक मोठी यशस्वी झेप घेतली आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे, भारताच्या दिशेने डागलेले कोणतेही क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणात येण्यापूर्वीच नष्ट करण्याची या स्वनातीत क्षेपणास्त्राची क्षमता आहे. ओडिशामधील बालासोर येथील प्रक्षेपक तळावरून ही चाचणी घेण्यात आली. 
या क्षेपणास्त्राची भारताने या वर्षात केलेली तिसरी यशस्वी चाचणी आहे. या स्वनातीत बॅलेस्टिक क्षेपणास्त्रामध्ये आपल्याकडे येणार्‍या कोणत्याही क्षेपणास्त्राला भेदण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रामुळे पृथ्वीच्या वातावरणात 30 कि.मी. उंचीच्या आतून जाणार्‍या कोणत्याही क्षेपणास्त्राला लक्ष्य करताना देशावर होणारा हल्ला रोखता येणार आहे.
चाचणीनंतर संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले, की आपले लक्ष्य थेट भेदण्यात हे क्षेपणास्त्र यशस्वी झाले असून ही मोठी बाब आहे. यापूर्वी भारताने याच श्रेणीतील दोन क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या अनुक्रमे 11 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी केल्या होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, आजची चाचणी क्षेपणास्त्राच्या विविध कामांच्या तपासणीसाठी करण्यात आली होती. ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. हे क्षेपणास्त्र 7.5 मीटर लांबीचे असून ते रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात आले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: