Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यात्राकाळात हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करणार : सौ. श्‍वेता सिंघल
ऐक्य समूह
Thursday, December 28, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: re6
5वाई, दि. 27 ः मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्‍वरी देवीची यात्रा दि. 1, 2 व 3 जानेवारी रोजी होत आहे. मंदिर परिसरात नेमून दिलेल्या सर्व जबाबदार्‍या संबंधित विभागांनी काळजीपूर्वक पार पाडाव्यात.
1 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत यात्रा स्थान आणि परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. इथे पशुबळी अथवा लिंबू , बिबे ठेवणे, झाडाला खिळे मारणे, वाद्य वाजविणे या कायद्याने गुन्हा आहे. भाविकांनी याचे पालन करून पोलीस यंत्रणेला आणि जिल्हा प्रशासनाला मदत करावी. यात्रा कालावधीत नेमणूक केलेल्या कर्मचार्‍यांनी परवानगीशिवाय गैर-हजर राहिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल यांनी दिला.
मांढरदेवी यात्रेची आढावा बैठक मांढरदेव येथील एमटीडीसीच्या हॉलमध्ये झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सर्व विभागांनी आपला आढावा सादर केला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, पोलीस उपअधीक्षक सौ. प्रेरणा कट्टे, तहसीलदार अतुल म्हेत्रे आदी अधिकारी उपस्थित होते.
सौ. सिंघल म्हणाल्या, अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाई करावी. यात्रा कालवधीत भारनियमन राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अन्न व औषध विभागाने अधिकृत परवाने देवून फलकांच्या माध्यमातून सूचना कराव्यात. आरोग्य विभागाने संयुक्तिकपणे आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रथमोपचार पथक, अत्यावश्यक सेवा याबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूला पडलेले दगड, अनावश्यक साहित्य काढून रस्त्याचे रुंदीकरण करावे. वळणाच्या मार्गावर रिफ्लेक्टर लावावेत. एस.टी. महामंडळाने वाहतुकीसाठी नवीन व जादा बसेस ठेवाव्यात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी एस. टी.मध्ये घेवू नयेत. तसेच निर्व्यसनी वाहन चालकांची नेमणूक करावी. 
पाणी पुरवठा विभागाने पाण्याची किती गरज आहे, किती उपलब्ध करता येईल याचे नियोजन करावे. पुरेसे पाणी उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टिकोनातून देवस्थान समितीने नियोजन करावे. मांढरदेव ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या निकषानुसार खड्डा काढून कचर्‍याची विल्हेवाट लावावी. ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचे शुद्धीकरण, तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता, जंतुनाशक औषध फवारणी, त्याच बरोबर रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा होऊ नये यासाठी दर्शन मार्गावर जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात येणार आहेत.  खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी ठरावीक ठिकाणी होऊ नये यादृष्टीने स्टॉलधारकांच्या जागांचे नियमन करावे. अन्न धान्यांच्या स्टॉलला परवानगी देतांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक करावे. मांढरदेव परिसरात नारळ फोडण्यास आणि तेल वाहण्यास पूर्णतः  बंदी करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, विनापरवाना स्टॉल लागणार नाहीत याची काळजी ग्रामपंचायतीने घ्यावी. अग्निशामक दल, अग्निशामक यंत्रे याची व्यवस्था देवस्थान समितीच्यावतीने करावी. सर्व यंत्रणांनी समन्वयाने यात्रा सुरळीत होण्यासाठी सतर्क रहावे.
एस.टी. महामंडळाकडून यात्रा कालावधीत 76 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून एक वाहतूक नियंत्रक अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली यात्रेच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे बस स्थानक स्थापन करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून 33 डॉक्टरांसह 116 लोकांची टीम दिवसरात्र कार्यरत राहणार आहे. आर.टी.ओ. आणि पोलिसांची गस्त टीम गाड्यांची तपासणी करणार आहे. जेणेकरून पशू, कोंबड्या यात्रेच्या ठिकाणी जावू नयेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांची 300 लोकांची प्रशिक्षित टीम येथे 24 तास असणार आहे. सर्व विभागांचा या यात्रेदरम्यान योग्य तो समन्वय रहावा यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने एकूण सोळा वॉकीटॉकी संचही  दिले जाणार आहेत. देवस्थान विश्‍वस्थांमार्फत नियंत्रण कक्ष स्थापणे, पशुहत्या बंदीबाबत सर्वत्र फलक लावण्यात येणार आहे. साफसफाईसाठी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीतर्फे तात्पुरत्या जोडण्या देण्यात येतील   तसेच काळजी घेण्याबाबत फलक लावण्यात येतील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. उत्पादन शुल्क विभागामार्फत यात्रेच्या दरम्यान तीन दिवस वाई शहर परिसरात मद्यविक्री बंद ठेवण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे भरून दुरुस्त केले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कठडे तयार करण्यात येत आहेत. ज्या बाबी अजूनही अपूर्ण आहेत त्या तत्काळ पूर्ण कराव्यात. सर्व विभागांनी सतर्क राहून एकमेकांच्या समन्वयाने काम करा.  कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून अशा घटना घडूच नयेत म्हणून आधीपासूनच काळजी घ्यावी. यात्रा काळात समस्या, अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सिंघल यांनी केल्या. 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक एम. डी. भोई, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. रोकडे, खंडाळाचे तहसीलदार विवेक जाधव, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आर. सी. रुणवाल, अन्न सुरक्षा अधिकारी डी. एस. साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अनिल बडवे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, गटविकास अधिकारी अशोक भवारी, भोरचे सहाय्यक गट विकास अधिकारी बी. एस. साळवे, पशुसंवर्धनचे सहाय्यक आयुक्त डॉ. पी. सी. हसनाळकर, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव, एस.टी. आगार व्यवस्थापक सौ. ज्योती गायकवाड, विभागीय वाहतूक अधिकारी डी. एस. कुलकर्णी, भोरच्या आगार व्यवस्थापक कु. स्वाती आवळे, पशुधन विकास अधिकारी विकास महाजन, राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक एन. एम. खांदवे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता राजकुमार साठे आदी अधिकार्‍यांनी आपापल्या विभागांचा आढावा जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. जिल्हाधिकार्‍यांनी मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टने व प्रशासनाने यात्रेतील भाविकांना सुलभ व सहज दर्शन होण्यासाठी ज्या, ज्या उपाययोजना केल्या आहेत त्यांची स्वतः पहाणी केली. त्यात भाविकांना केलेले बॅरेगेटिंग, महाव्दार, पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर, पार्किंगची केलेली व्यवस्था, भाविकांच्या रहाण्याच्या जागेची पहाणी तसेच  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या रडार यंत्रणेची पहाणी केली.
यावेळी वीज वितरणचे शाखा अभियंता यादव, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अविनाश पाटील, जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता एस. टी. जाधव, गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, सहाय्यक कामगार आयुक्त डी. के. जाधव, मंडलाधिकारी अनिल हरिदास, एस. बी. साबणे, के. एस. पिसाळ आदींसह विविध विभागांचे, भोर, खंडाळा, वाई, पुणे येथील अधिकारी उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: