Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: mn2
कोणाची मते फुटणार याकडे लक्ष
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (गुरुवार) मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड व काँग्रेसचे दिलीप माने यांच्यातील लढत एकतर्फी दिसत असली तरी कोणाची, किती मते फुटणार याबाबत उत्सुकता आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आज दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक होणार असून भाजपचे पारडे जड आहे. मात्र, मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपबरोबर गेलेल्या नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने राणे यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली असून शिवसेनेनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. विजयासाठी 145 आमदारांचे पाठबळ आवश्यक असून भाजपची 122 व शिवसेनेची 63, अशी एकूण 185 मते लाड यांच्याकडे आहेत. शिवाय अपक्ष व अन्य अशा 10 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या दिलीप माने यांच्याकडे काँग्रेस व राष्ट्रवादीची 81 व अन्य सात, अशी एकूण 88 मते आहेत. त्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार असली तरी युतीतील नाराजीमुळे मते वाढण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने दिलीप माने यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना 205 मते मिळाली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत युतीतील नाराजीमुळे हा आकडा खाली येणार का, याचे कुतूहल आहे. शिवाय वर्षानुवर्षे पक्षाचे काम निष्ठेने करणार्‍या इच्छुकांना डावलून पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून आयात केलेला उमेदवार लादल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. 
त्यामुळे निकाल बदलला नाही तरी मते फुटल्यास सरकारला नामुष्की पत्करावी लागू शकते.
पंचतारांकित मेजवानीचा ‘लाड’
भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला युतीच्या आमदारांसाठी पंचतारांकित हॉटेलात स्नेहभोजन आयोजित केले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये
बैठक झाली. आपली मते फुटू नये यासाठी दोन्ही बाजूंनी दक्षता घेतली जात आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: