Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: na2
पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश
5गडचिरोली, दि. 6 (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू असताना बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या नक्षलवादविरोधी विशेष पथकाने सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील कल्लेड जंगलात बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही चकमक झाली. झिंगनूर आऊटपोस्टच्या उत्तरेस सुमारे 15 कि.मी. अंतरात झालेल्या या चकमकीत सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात नक्षलवादविरोधी विशेष पथकाच्या पोलिसांना यश आले. ठार झालेल्यांमध्ये पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाले. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व प्रचारसाहित्य जप्त करण्यात आले आहे. नक्षलवाविरोधी विशेष पथक मोहिमेवर असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ही मोहीम मंगळवारी मध्यरात्री सुरू झाली. या पथकाच्या सहाय्यासाठी ‘सी-60’ कमांडोंचे पथक पाठवण्यात आले होते. त्यानंतर ही चकमक झाली, असे नक्षलवादविरोधी कारवाईचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी सांगितले.
कल्लेड जंगलातील हा परिसर छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे. तेथे पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले. या चकमकीत किमान दोन नक्षलवादी जखमी झाले आहेत. त्यांना घेऊन त्यांचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले, असे शेलार यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये दोन एसएलआर रायफल्स, दोन 303 रायफल्स, बारा बोअरच्या दोन बंदुका, एक गावठी पिस्तूल यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन येण्यासाठी आणि मोहिमेवरील पथकाला परत आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.   
आणखी एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील कल्लेड जंगलात नक्षलवाद्यांनी दि. 2 ते 8 डिसेंबर या कालावधीत पीपल्स लिबरेशन गरिला आर्मी सप्ताहाची हाक दिली असून अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्त मोहीम आखली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: