Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
औद्योगिक विकास महामंडळातील लिपिकास लाच घेताना पकडले
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 6:   येथील औद्योगिक विकास महामंडळ व्यवस्थापक कार्यालयातील लिपिक प्रवीण कृष्णा मरळे (वय 37, सध्या रा. गणेश चौक, कोडोली, मूळ रा. तुपारी, जि सांगली) याला 15 हजाराची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी एमआयडीसी कार्यालयाच्या दालनात रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे सातार्‍यातील असून त्यांचा सातारा औद्योगिक वसाहतीत प्लॉट आहे. तो प्लॉट गहाण ठेवून बँकेच्या कर्जासाठी औद्योगिक वसाहतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी तक्रारदाराने व्यवस्थापकांकडे अर्ज केला होता.
लिपिक मरळे यांनी या प्रमाणपत्रासाठी तक्रारदारांकडे 15 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या अर्जानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या सूचनेनुसार पोलीस निरिक्षक बयाजी कुरळे आणि त्यांच्या पथकाने मरळे याला अटक केली. त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, पोहवा आनंदराव सपकाळ, संभाजी बनसोडे, भरत शिंदे, विजय काटवटे, पो.ना. तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसूळ, पो.कॉ. अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विनोद राजे, विशाल खरात व  मपोना जमदाडे, कुंभार व माने यांनी केली आहे. 
लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: