Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियमात सुधारणा करणार
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: mn4
शुल्कामध्ये समानता आणण्याचा उद्देश : तावडे
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी : राज्यातील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची फी एकसमान असावी यासाठी ‘महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम 2011’मध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांची फी एकसमान असावी यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक फी एकसमान असावी आणि शैक्षणिक शुल्क सुधारणेचे प्रारूप तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश व्ही. जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल आज राज्य सरकारला सादर केला.
शुल्कवाढीबाबत या समितीने पालकांकडून आणि संस्थांकडून आलेली निवेदने स्वीकारून त्यांचा अभ्यास केला. समितीने ’महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम 2011’ याचाही पूर्ण अभ्यास केला. समितीने सुचवलेल्या सुधारणेनुसार शुल्कवाढीबाबत पालकांना व संस्थांना शुल्क नियंत्रण समितीकडे अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्थांना दरवर्षी 7.5 टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवता येते. त्यामुळे शिक्षण संस्थांनाही या सुधारणेचा फायदा मिळणार आहे. या समितीने दिलेल्या अहवालानुसार पालक-शिक्षक संघटनेमध्येही पालकांचे प्रतिनिधित्व एका सदस्यावरून दोन करण्यात आले आहे.
या समितीने शुल्क विनियमन संदर्भातील काम 6 मे 2017 रोजी सुरू केले आणि सात महिन्यांनी आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. समितीच्या अहवालाचा अभ्यास करून मार्च 2018 पूर्वी अधिनियमात बदल करण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.
‘रोबोमेट प्लस’ अ‍ॅपचे उद्घाटन
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट प्लस’ या मोबाईल अ‍ॅपमुळे (संगणकीय प्रणाली) दहावीच्या विद्यार्थ्यांना आता अभ्यास करणे सोपे होणार आहे. हे मोबाईल अ‍ॅप दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत डाऊनलोड करता येणार असून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी उत्तम ‘ई-मार्ग’ उपलब्ध झाला आहे. तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकवलेले सर्व विषयांचे व्हिडिओ सोप्या भाषेत या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास तावडे यांनी व्यक्त केला. यावेळी ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्रेणीक कोटेचा उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: