Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 11:09 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 5 (वृत्तसंस्था) :भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यावर मंगळवारी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी गर्दी केली होती. अनेकांनी शशी कपूर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजारानंतर काल (सोमवार) मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी लोटली होती. शशी कपूर यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव तिरंगा ध्वजात लपेटण्यात आले होते. अंत्ययात्रा सांताक्रूझ येथील स्मशान भूमीत पोहोचल्यावर पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शशी कपूर यांना मानवंदना दिली.
त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कारकरण्यात आले. शशी कपूर यांच्याअंत्यविधीसाठी त्यांचे पुतणे रणधीर कपूर, ऋषी कपूर, नीतू कपूर, रणबीर कपूर, करिना कपूर-खान, करिश्मा कपूर यांच्यासह संपूर्ण कपूर कुटुंबीय   उपस्थित होते. आपल्या जीवलग मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी अमिताभ बच्चन हेही उपस्थित होते. अभिषेक बच्चन, ऐश्‍वर्या राय-बच्चन, नासिरुद्दीन शाह, अनिल कपूर, संजय दत्त, राणी मुखर्जी, शक्ती कपूर व अनेक अभिनेते, अभिनेत्री यावेळी उपस्थित होत्या. अनेक कलाकारांनी शशी कपूर यांना सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहिली. केवळ कलाकारच नाही, तर शशीजींच्या अनेक चाहत्यांनीदेखील सोशल मीडियावर भावूक होऊन संदेश लिहिले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: