Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ओखी वादळाचे गुजरातकडे मार्गक्रमण मुंबईवरील धोका टळला
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 5 (वृत्तसंस्था) :मुंबईवरील ओखी चक्रीवादळाचा मंगळवारी असलेला धोका टळला असून या वादळाने रात्री मुंबईपासून 230 किमी दूर समुद्रातून गुजरातकडे मार्गक्रमण केले. पुढे या वादळाचा वेग मंदावत जाईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
या वादळाचा मुंबईला कोणताही मोठा फटका बसला नाही. मात्र, गुजरातच्या किनारपट्टी भागाला विशेषत: सूरतला या वादळाचा काही प्रमाणात फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
वादळाच्या प्रभावामुळे मुंबईत आज दिवसभर पाऊस कोसळत होता. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबईत अद्यापही पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत रात्री वेगाने वारे वाहू शकतात. मात्र, वादळाचा धोका मात्र नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ओखी वादळाच्या तडाख्याने तमिळनाडू आणि केरळमध्ये एकूण 39 जणांचा मृत्यू झाला आहे तर 167 मच्छीमार अद्याप बेपत्ता असून दोन्ही राज्यातील 809 मच्छीमार महाराष्ट्रात सुरक्षित असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली.
ओखी वादळाचा वेग आता मंदावला आहे. गुजरातमध्ये या वादळाचा विशेष परिणाम दिसणार नाही, असेही गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजीव कुमार यांनी सांगितले.  
ओखी चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन गुजरातकडे सरकत असल्याने या वादळाच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील नियोजित प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत. नौदल आणि एनडीआरएफची पथके आज रात्रीच गुजरातकडे रवाना करण्यात आली असून मुख्यमंत्री विजय रुपानी संभाव्य धोक्याचा आढावा घेत असून राज्य सरकार उपाययोजना करत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: