Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंड्या धाराशिवकरच्या टोळी विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 10:52 AM (IST)
Tags: re1
रेवडीतील सहा एकर जमीन बळकावली
5कोरेगाव, दि. 5  : सातार्‍यासह पश्‍चिम महाराष्ट्रात खासगी सावकारीची पाळेमुळे रोवणार्‍या आणि पोलिसांपुढे आव्हान ठरलेल्या प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर याच्या टोळीच्या विरोधात आता कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खंड्या याच्यासह टोळीला सावकारीत मोक्का लावला असला तरी त्याच्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. 50 लाख रुपये देऊन रेवडीतील दोन वृद्ध शेतकर्‍यांची सहा एकर जमीन सावकारीतून बळकावल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की रेवडी, ता. कोरेगाव येथे हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांची शेती असून त्यांचे गावात असलेल्या विकास सोसायटीचे सचिव दशरथ संपत भोसले यांच्याशी जवळचे संबंध होते. आवारे यांच्याशी असलेल्या संबंधातून भोसले यांनी आर्थिक व्यवहार देखील सुरू केेले होते. दशरथ भोसले व जळगाव, ता. कोरेगाव येथील खाजगी बसचे व्यावसायिक दिनकर यशवंत जाधव यांचे जवळचे संबंध होते व आर्थिक व्यवहार देखील त्यांच्यामध्ये होते. भोसले यांच्यामुळे जाधव व आवारे यांच्यामधील संबंध वाढले होते व त्यांचे जाधव यांच्या कार्यालयात जाणे-येणे होते. 2015 मध्ये मे महिन्यामध्ये दशरथ भोसले हा रेवडी येथे आला व त्याने हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांना बोलावून घेतले. दिनकर जाधव हे आर्थिक अडचणीत आले असून त्यांना सध्या 50 लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. जाधव यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या संबंधातून मदत करण्याची भावना आवारे यांनी व्यक्त केल्यानंतर सर्वजण कोरेगावातील जाधव यांच्या कार्यालयात गेले व त्यांच्याशी चर्चा केली. दिनकर जाधव यांनी हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांना मदत करण्याची विनंती केली. 
त्यावर दोघांनी आमच्याकडे एवढे पैसे कोठून येणार असे सांगताच जाधव याने तुमची रेवडीतील जमीन गहाण ठेवून पैसे द्या, अशी विनंती केली. दशरथ भोसले यांनी दिनकर जाधव हा चांगला माणूस असून ते तुम्हाला यथावकाश मदत करतील अशी हमी देऊन त्यांना मदत केली पाहिजे, असे सांगितले. त्यानंतर  रेवडीतील सहा एकर जमीन गहाण ठेवून मदत करूया, असे आवारे यांनी सांगितले.
दशरथ भोसले हे दि. 15 मे रोजी रेवडीत गेले आणि त्यांनी हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांना बोलावून घेत माझे मेव्हणे प्रदीप धोंडिराम घाडगे, रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव हल्ली विकासनगर- खेड, सातारा याने तुमची जमीन गहाण ठेवून 50 लाख रुपये देणारा माणूस पाहिला असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण घाडगे याच्या विकासनगर येथील घरी गेले. तेथून घाडगे याने सर्वांना प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर याच्याकडे नेले. भोसले व घाडगे यांनी खंड्या धाराशिवकर याच्यासमोर सर्व हकीकत कथन करून हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांची जमीन गहाण ठेवून 50 लाख रुपये व्याजाने देण्याची विनंती केली. खंड्याचे वर्तन पाहून हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांनी तो गुंड आहे, त्याच्याकडे आम्ही जमीन गहाण ठेवणार नसल्याचे बजावले. त्यावर दशरथ भोसले याने दुसरा मार्ग काढू, असे सांगितले. तद्नंतर भोसले याने ही जमीन मेव्हणे प्रदीप घाडगे याच्या नावे गहाण ठेवूया, असे सांगितल्यावर हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे हे दोघेजण जमीन गहाण ठेवण्यास तयार झाले. दिनकर जाधव याने विनंती करून जमीन गहाण ठेवा, मी व्याजासह पैसे परत करून तुमची जमीन तुम्हाला परत सोडवून देतो, त्याची जबाबदारी माझी आहे, असे सांगितले. जाधव याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांनी जमीन गहाण ठेवण्यास सहमती दर्शवली. रेवडी येथील गट नं. 267 मधील 1 हेक्टर 20 आर व गट नं. 168 मधील 1 हेक्टर 20 आर या जमिनीचे सातबारा उतारे घेऊन दि. 19 मे 2015 रोजी हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे हे दोघेजण कोरेगाव येथे तहसील कार्यालयाच्या आवारात आले व त्यांनी दशरथ भोसले यांना सर्व कागदपत्रे आणली असल्याचे सांगितले.
खंड्या धाराशिवकर व त्याचे साथीदार तेथे आले होते. त्यांनी जवळील एका संगणक केंद्रामध्ये जाऊन दस्त टाईप करून आणला व हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांना तुमचे गहाणखत तयार झाले आहे, तुम्ही आता दुय्यम निबंधक कार्यालयात साहेबांसमोर चला, असे बजावले. तेथे साहेबांसमोर हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांनी दस्त करून दिला. दस्त झाल्यावर त्याची प्रत मागितल्यावर घाडगे याने परत देतो, असे सांगून वेळ मारून नेली. सर्वजण तहसील कार्यालयानजीक असलेल्या एका हॉटेलात गेले व तेथे खंड्या धाराशिवकर याने 50 लाख रुपयांच्या व्यवहारापोटी पाच लाख रुपये कापून घेतले व पैशांची पिशवी दशरथ भोसले याच्याकडे दिली.
हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे हे दशरथ भोसले याच्यासमवेत दिनकर जाधव याच्या कार्यालयात गेले व तेथे भोसले याने 25 लाख रुपये जाधव यांना दिले व उर्वरित 20 लाख रुपये घेऊन सर्वजण सातारारोड येथे गेले. सातारारोड विकास सोसायटी कार्यालयात पैशांची पिशवी घेऊन दशरथ भोसले हा थांबला व तेथून हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे हे महेंद्र मोरे याच्यासमवेत मोटरसायकलवरून रेवडीत गेले. दि. 20 मे रोजी दशरथ भोसले याने आणखी 15 लाख रुपये दिनकर जाधव याला दिल्याचे हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांना बोलावून घेत सांगितले. दशरथ भोसले याने जून 2015 पासून सात महिन्यांच्या व्याजाची रक्कम खंड्या धाराशिवकर याला दिली होती. त्यानंतर खंड्या हा रेवडीतील हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांच्या घरी गेला व दशरथ भोसले हा व्याजाचे पैसे देत नाही, या महिन्यपासून तुम्हालाच व्याजाचे पैसे द्यावे लागतील, असे बजावले. त्यावेळी हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांनी आमची जमीन गहाण ठेवून दिनकर जाधव याला पैसे दिल्याचे सांगितल्यावर खंड्या याने तुम्ही तुमची जमीन मला विकलेली असून ती जमीन प्रदीप धोंडिराम घाडगे व संजय रामचंद्र जाधव यांच्या नावे खरेदीदस्त केला असल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ खंड्या हा अधून-मधून रेवडीत येऊन दोघा भावांना प्रत्येक महिन्याचे थकलेले पाच लाख रुपये मागत होता व दमदाटी करून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता. फेब्रुवारी 2016 मध्ये खंड्या याने सर्वांना विकासनगर येथे बोलावून घेतले. यावेळी दशरथ भोसले याचे वडील संपत भोसले हे देखील होते. खंड्या याने व्याजाच्या रकमेची मागणी केली. त्यानंतर तुमच्या जमिनीचा दस्त दुसर्‍याच्या नावे केला असल्याचे खंड्याने सांगितले. यावेळी सर्व बोलण्याचे रेकॉर्डिंग नारायण जगन्नाथ आवारे याने करून घेतले होते. त्यानंतर पाच ते सहा दिवसातच खंड्या धाराशिवकर, हाजी इनामदार, हृदयनाथ पार्टे व अन्य दहा ते पंधरा सहकारी काठ्या घेऊन रेवडीतील  शेतावर गेले व व्याजापोटी ऊस तोडून नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर खंड्या व त्याच्या सहकार्‍यांनी दोन वेळा अंदाजे 125 टन व 50 टन ऊस तोडून नेला. त्यानंतर 12 गुंठे क्षेत्रातील आले पीक व एक एकरातील सोयाबीन पीक काढून नेले. एकंदरीत 12 लाख 50 हजार रुपयांची पिके परस्पर चोरून नेली. मार्च 2017 मध्ये पुन्हा 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचा ऊस तोडून नेला. त्यानंतर हाजी इनामदार व सहकारी सातत्याने व्याजाच्या पैशाची मागणी करून धमकी देत होते.
सुरुवातीला प्रदीप धोंडिराम घाडगे व संजय रामचंद्र जाधव याच्या नावे केलेला दस्त हा खंड्या याने दि. 30 जानेवारी 2016 रोजी हृदयनाथ शामराव पार्टे, रा. कोडोली-सातारा व लक्ष्मीबाई रामचंद्र जाधव, रा. प्रतापसिंहनगर खेड-सातारा यांच्या नावे करून दिला आहे. दि. 18 फेब्रुवारी 2017 रोजी लक्ष्मीबाई जाधव यांच्या नावे जमीन केल्याचे निदर्शनास आले. ही बाब आवारे बंधूंनी दिनकर जाधव यांच्या कानावर घातली, मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. एकूणच खंड्या धाराशिवकर व त्याच्या टोळीने व्याजापोटी जमिनीचा दस्त लबाडीने करून घेत त्यावरील पिके चारून नेली आहेत. या प्रकरणी हणमंत श्रीपती आवारे यांनी प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर, प्रदीप धोंडिराम घाडगे, संजय रामचंद्र जाधव, हृदयनाथ शामराव पार्टे, लक्ष्मीबाई रामचंद्र जाधव, हाजी इनामदार व 8 ते 10 अनोळखी साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे व सहाय्यक फौजदार वसंत साबळे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: