Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘तो’ मृतदेह अनिकेत कोथळेचाच
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 10:47 AM (IST)
Tags: mn1
डीएनएचा अहवाल; संशयितांभोवतीचा फास आवळला
5सांगली, दि. 5 (प्रतिनिधी) :पोलिसांनी ‘थर्ड डिग्री’ वापरून अनिकेत कोथळे या युवकाचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणाच्या तपासातील मुख्य मुद्दा असलेला डीएनएचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. आंबोलीच्या दरीतून जप्त करण्यात आलेला मृतदेह अनिकेतचाच असल्याचे या चाचणीतून सिद्ध झाले आहे. पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्य प्रयोग शाळेकडून डीएनएचा अहवाल आजच मिळाल्याची माहिती सीआयडीचे अप्पर पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकारांना दिली.
डीएनए अहवाल तपास यंत्रणेच्या हाती लागल्याने संशयित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदार पोलिसांभोवतीचा फास आणखी आवळला गेला आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत दि. 6 नोव्हेंबर रोजी रात्री पोलिसांनी  अमानुष ‘थर्ड डिग्री’चा अतिवापर केल्याने अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. आपला खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी संशयित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड यांच्यासह सहा जणांनी अनिकेतचा मृतदेह खासगी गाडीतून आंबोलीच्या दरीत नेला होता. तेथे पेट्रोल आणि डिझेल टाकून अनिकेतचा मृतदेह जाळला. तो मृतदेह एकदा जळला नाही म्हणून पुन्हा एकदा जाळण्याचा प्रयत्न झाला. दरम्यानच्या काळात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे हे दोघे पोलीस कोठडीत नसल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्या दोघांनी पोलिसांच्या हाताला हिसडा मारून पळकाढल्याचे कामटे आणि त्याच्या साथीदारांनी तपासा-दरम्यान सांगायला सुरुवात केली.  
वस्तुस्थितीमध्ये पोलिसांनी अनिकेतचा कोठडीतच खून केल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचल्याने जनक्षोभ वाढत गेला. पळून गेलेल्यांपैकी अमोल भंडारे हा सापडल्याचे सांगून त्याला घेऊन कामटे आणि टोळी सांगलीत परतली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी काळजीपूर्वक या पोलिसांच्या टोळीला ताब्यात घेतल्यानंतर नेमका प्रकार चव्हाट्यावर आला. अनिकेत कोथळेचा अर्धवट जळालेला मृतदेह आंबोलीत ज्या ठिकाणी जप्त करण्यात आला, त्याच परिसरात आणखी एक मृतदेह सापडल्याने पुन्हा खळबळ उडाली होती. पोलिसांनी जप्त केलेला मृतदेह नेमका अनिकेतचाच आहे का, याची खातरजमा करण्यासाठी डीएनए चाचणीचा अहवाल प्रमाण ठरणार होता. अनिकेतच्या आई-वडिलांच्या रक्ताचे नमुने डीएनएसाठी गेल्यापासून अहवाल काय येणार, याकडे लक्ष लागले होते. अखेर डीएनएचा अहवाल आला आहे. तो मृतदेह अनिकेतचाच असल्याचे सिद्ध झाल्याचे सीआयडीने मंगळवारी जाहीर केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी करत आहेत.  डीएनएबरोबरच आणखी वैद्यकीय अहवाल महत्त्वाचे पुरावे ठरणारे आहेत. ते अहवाल मिळायला थोडा वेळ लागेल. लकी बॅग आणि शहर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील फुटेज उपलब्ध झाल्यानंतर आणखी काही भक्कम पुरावे हातील लागतील. अद्याप अनेकांचे जबाब घ्यायचे आहेत. ज्यांचे जबाब झाले आहेत, त्यांच्या जबाबानुसार पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
गुन्ह्याच्या मुळाचा शोध
 अनिकेत कोथळे खून प्रकरणात डीएनएचा अहवाल येऊन पोलिसांनी जाळलेला मृतदेह अनिकेतचाच असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आता सीआयडीने गुन्ह्याचे मूळ शोधायला सुरुवात केली आहे. दि. 5 नोव्हेंबर रोजी पहाटेपासून ते अनिकेतचे प्रकरण चव्हाट्यावर येईपर्यंतच्या कालावधीत कोणत्या वेळी किती संशयित कोठडीत होते? कोणकोणत्या अधिकार्‍यांनी कोठडीतील संशयितांच्या संख्येची नोंद केली, याचा अहवाल सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी मागवला आहे. या पार्श्‍वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात जावून प्रत्यक्ष नोंदीची माहिती घेतली.
अधिक माहिती घेऊन पुढील कार्यवाही
अनिकेत कोथळे खून प्रकरणी डीएनएचा अहवाल येवून तो मृतदेह अनिकेतचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबोलीतून पोलिसांनी जप्त केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर अ‍ॅनॉटॉमी आणि डीएनएसाठी पाठविण्यात आला होता. आमच्याकडे केवळ आंबोलीतून ताब्यात घेतलेल्या काही अस्थी आहेत. आता डीएनए अहवाल आल्यानंतर प्रयोगशाळेशी संपर्क साधून उर्वरित मृतदेह पुन्हा पोलिसांच्या ताब्यात मिळू शकतो का, याबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: