Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भ्रष्टाचारामुळे ‘सीपेक’चा अर्थपुरवठा रोखला
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: na2
चीनचा पाकिस्तानला दणका
5इस्लामाबाद, दि. 5 (वृत्तसंस्था) : चीनची तब्बल 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या ‘चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (सीपेक) अंतर्गत येणार्‍या तीन मोठ्या रस्ते प्रकल्पांचा आर्थिक पुरवठा चीनने रोखला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चीनने हे पाऊल उचलले असून या निर्णयामुळे पाकिस्तानला जोरदार दणका बसला आहे. ‘सीपेक’ हा चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘वन बेल्ट वन रोड’चा (ओबीओआर) महत्त्वपूर्ण भाग आहे. ‘सीपेक’चा काही भाग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने चीनच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला भारताने आधीपासूनच विरोध केला आहे.
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चीनचा पश्‍चिम भाग अरबी सुमद्राला जोडण्याचा शी जिनपिंग यांच्या सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, या मार्गिकेतील तीन मोठ्या रस्ते प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमुळे या प्रकल्पांचा अर्थपुरवठा चीनने रोखला आहे.
चीनने आर्थिक रसद रोखल्याने पाकिस्तानच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा वेग मंदावणार आहे.
‘सीपेक’साठी केले जाणारे अर्थसहाय्य रोखण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘द डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे. पाक सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘सीपेक’ प्रकल्प चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत येतो. या मार्गिकेसाठी चीनकडून तब्बल 50 अब्ज डॉलर (3.86 लाख कोटी रुपये) गुंतवणूक केली जात आहे. या योजनेंतर्गत पाकिस्तानमध्ये व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे विविध प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. ‘सीपेक’मुळे पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडला जाईल. मात्र, चीनने या योजनेसाठी आवश्यक असलेला अर्थपुरवठा रोखण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानला दणका बसला आहे. 
यापुढे चीनकडून नव्या नियमावलीनुसार या योजनेसाठी अर्थपुरवठा केला जाईल. चीनने अर्थपुरवठा थांबवल्याने ‘डेरा इस्लाइल खान-झोब रोड’, ‘खुजदार-बसिमा रोड’, ‘रायकोट-थाकोट काराकोरम महामार्ग’ हे तीन मोठे रस्ते प्रकल्प रखडणार आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: