Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
vasudeo kulkarni
Tuesday, December 05, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: lo1
ओखी चक्रीवादळाचा प्रभाव
5सातारा, दि. 4 : ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसाने सर्वांची दैना केली.
केरळ व तमिळनाडूमध्ये हाहाकार माजवल्यानंतर ओखी चक्रीवादळाचा मुंबई किनारपट्टीला तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र वादळाच्या केंद्राची दिशा बदलल्यामुळे त्याचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे मुंबई किनारपट्टीला काही काळ दिलासा मिळाला असला तरी मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली होती. या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम सातारा जिल्ह्यातील नागरिकांना सोमवारी अनुभवयाला मिळाला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता होती. दुपारनंतर पुन्हा ऊन पडल्यामुळे पावसाची शक्यता धुसर झाली होती; परंतु सायंकाळी 6.30 पासून झिरझिर पावसास सुरुवात झाली. काही वेळातच पावसाने जोर धरला. पावसाची कल्पना नसल्यामुळे व्यापारी, पदपथावर भाजी, फळे व इतर साहित्य विक्रसाठी बसलेल्या विक्रेत्यांची आणि बाजारात खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच दैना उडाली. सातार्‍यात गांधी मैदानावर भरणार्‍या चौपाटीवर खवैयांची तारांबळ उडाली. सातार्‍यात रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहत होते. सातार्‍यातील अनेक भागातील वीजपुरवठा काही वेळ खंडितझाला होता.  
पावसाने जवळपास पाऊण तास हजेरी लावली. हा पाऊस काही पिकांना चांगला तर काही पिकांना नुकसानकारक ठरणारा आहे. या पावसाचा स्ट्रॉबेरीच्या पिकाला फटका बसणार आहे. सातारा शहरासह कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी परिसरातही पाऊस झाला.
कराड तालुक्यात जोरदार पाऊस
कराड तालुक्यातही सोमवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. कराड शहर, कोळे व तांबवे, मसूर, ओगलेवाडी, उंडाळे, काले या भागात चांगला पाऊस झाला. कराड शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. कराड बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. बाहेरगावाहून गाड्या उशिरा येत होत्या. उंडाळे भागात पावसाने हजेरी लावली. मसूर परिसरातही चांगला पाऊस पडला. काले, ओगलेवाडी, कोळे, पोतले, आणे, तांबवे या भागातही पाऊस झाला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: