Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राहुल गांधींच्या अध्यक्षपदाची औपचारिकता बाकी
ऐक्य समूह
Tuesday, December 05, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: na1
काँग्रेसला ‘औरंगजेब राजवटी’च्या शुभेच्छा : मोदी
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी गांधी घराण्यातील राहुल गांधी हे सज्ज झाले असून काँग्रेसचे अध्यक्षपद सहाव्यांदा गांधी कुटुंबाकडेच जाणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. राहुल गांधी यांच्या विरोधात काँग्रेसच्या कोणी अन्य नेत्याने उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने आता त्यांची अध्यक्षपदी निवड होण्याची औपचारिकताच बाकी असल्याचे मानले जात आहे. याबाबतची औपचारिक घोेषणा उद्या (मंगळवार) करण्यात येईल. 
दरम्यान, काँग्रेसला ‘औरंगजेब राजवटी‘च्या शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमधील घराणेशाहीवर टीकास्त्र सोडले.
राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा 19 वर्षे सांभाळल्यानंतर आता या पदाची धुरा नव्या पिढीकडे जाणार आहे. आजच्या घडामोडींमुळे राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, सिद्धरामय्या, सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, टी. सुब्बरामी रेड्डी, जयपाल रेड्डी, मुकुल संगमा, आनंद शर्मा, ऑस्कर फर्नांडिस, कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जांचे दोन संच दाखल केले. त्यांना अहमद पटेल, मनमोहनसिंग, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी, भूपेंद्रसिंग हुडा, सी. पी. जोशी, कुमारी सेलजा, के. सी. वेणुगोपाल, ज्योतिरादित्य शिंदे, टी. सुब्बरामी रेड्डी, जयपाल रेड्डी, मुकुल संगमा, आनंद शर्मा, ऑस्कर फर्नांडिस, कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम, सलमान खुर्शीद, जनार्दन द्विवेदी, शिवराज पाटील, मीराकुमार, हरिश रावत, अविनाश पांडे, बी. के. हरिप्रसाद हे सूचन व अनुमोदक आहेत. राहुल गांधी यांनी मातोश्री सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या. 
त्यानंतर पक्षातील अन्य दिग्गज नेत्यांनीही राहुल गांधी यांच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. आपल्याकडे एकूण 89 उमेदवारी अर्जांचे संच दाखल झाले असल्याची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणी अर्ज दाखल केले आहेत का, असे विचारले असता, उद्या उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर ते स्पष्ट होईल, असे रामचंद्रन यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज मागेघेण्याची मुदत 11 डिसेंबर असून आवश्यकता भासल्यास 16 डिसेंबरला मतदान आणि 19 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, राहुल गांधी यांना पक्षातून आव्हान मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या अध्यक्षपदाच्या घोषणेची औपचारिकताच बाकी राहिली आहे. राहुल गांधी हे बिनविरोध अध्यक्ष झाल्यास काँग्रेसमधील घराणेशाहीवर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे गुजरात निवडणुकीत भाजपच्या हाती आयते कोलीत मिळेल.
पंतप्रधान मोदींची टीका
दरम्यान, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. गुजरातमधील एका प्रचार सभेत बोलताना मोदींनी यापुढील ‘औरंगजेब राजवटी’साठी काँग्रेसला शुभेच्छा, अशा शब्दात टीकास्त्र सोडले. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले असताना मोदींनीही धरमपूरमधील प्रचारसभेत राहुल यांच्यावर तोफ डागली. 17 व्या शतकातील मुघल सम्राट औरंगजेब याचे उदाहरण देत, मोदींनी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीची तुलना औरंगजेबच्या राजवटीशी केली. यापुढील ‘औरंगजेब राजवटी’साठी काँग्रेसचे अभिनंदन करतो, असा टोला त्यांनी लगावतानाच आमच्यासाठी देश मोठा असून सव्वाशे कोटी जनता आमची व देशाची ‘हायकमांड’ आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा मोदींनी उल्लेख केला. जहांगीरच्या जागी शहाजहाँ आला, त्यावेळी निवडणुका झाल्या का? शहाजहाँच्या जागी औरंगजेब आला, त्यावेळी निवडणुका झाल्या का? सम्राटाच्या मुलाच्या हाती सत्ता सोपवणार, हे सगळ्यांनाच माहिती होते, असे अय्यर म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेस एका घराण्याचाच पक्ष आहे, हे त्यांच्या नेत्यांनी मान्य केले आहे का? औरंगजेब राजवट काँग्रेसलाच लखलाभ होवो, असे मोदी म्हणाले. मात्र, मोदींच्या टीकेला अय्यर यांनी प्रत्युत्तर दिले. मी दिलेले उदाहरण केवळ पूर्वीच्या राजसत्तेबाबत होते; परंतु काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पक्षातील कोणीही व्यक्ती निवडणूक लढवू शकते. लोकशाही प्रक्रियेनुसारच निवडणूक होत आहे, असे अय्यर म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: