Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
म्हसवड येथे महिलेला धाक दाखवत दीड तोळ्याच्या सोन्यासह चोरटा पसार
ऐक्य समूह
Tuesday, December 05, 2017 AT 11:49 AM (IST)
Tags: re5
5म्हसवड, दि. 4 : म्हसवड येथे सकाळी सौ. तायनाबाई मरिबा लोखंडे (वय 45) या महिलेला अज्ञात चोरट्याने तुला मोटरसायकलवरून लोखंडेवस्तीला सोडतो म्हणून गाडीवर बसवले व पुढे तीन किलोमीटर अंतरावरील माळरानात नेऊन त्या महिलेला धाक दाखवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील सोन्याची फुले, झुबे, असे सुमारे दीड तोळे सोने लंपास केल्याची घटना घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोखंडे वस्ती, ता. माण येथील तायनाबाई मरिबा लोखंडे व त्यांची मुलगी सीमा दत्ता कांबळे (रा. दिवड, ता. माण) या दोघी मार्डी, ता. माण येथे पाहुण्यांच्या लग्नासाठी रविवारी गेल्या होत्या. लग्नानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी मार्डीवरून म्हसवडला आल्या. मुलगी सीमा दिवड गावी गेली. तर तायनाबाई या लोखंडे वस्तीला जाण्यासाठी मारूतीच्या मंदिराजवळ बसल्या होत्या. सकाळी 9.30 च्या सुमारास एक अज्ञात मुलगा गाडीवरून आला व मी धुळदेवला चाललो आहे. तुम्हाला लोखंडे वस्तीला सोडतो, असे सांगून त्या महिलेला गाडीवर बसवून घेऊन गेला. तीन कि. मी. अंतरावर निर्जन ठिकाणी माळरानात गेल्यावर गाडी रानात घेऊन जाऊ लागला.   
त्यावेळी त्यांनी गाडी इकडे कुठे घेऊन चाललाय, असे विचारले असता एक म्हातारी आहे तिला साळमुखला सोडायचे आहे, असे त्याने सांगून गाडी पुढे नेली.
रस्त्यापासून लांब रानात गाडी नेल्यानंतर त्या महिलेला धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र, कानाला हिसका देत कानातील सोन्याची फुले व झुबे चोरून पोबारा केला. या घटनेनंतर महिलेने पुतण्याला फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पुतण्याने तातडीने घटनास्थळी जाऊन चुलतीला म्हसवड येथे आणले व तेथे खाजगी दवाखान्यात तिच्यावर उपचार केले. या घटनेने सदर महिला भयभीत झाली आहे. महिला वर्गामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: