Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन
ऐक्य समूह
Tuesday, December 05, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: mn1
5मुंबई, दि. 4 (वृत्तसंस्था) : आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीवर वेगळा ठसा उमटवलेले आणि रोमँटिक भूमिकांमुळे 1970 च्या दशकात लाखो तरुणींच्या दिलांची धडकन बनलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे मुंबईत दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. या मनस्वी, देखण्या, रुबाबदार कलाकाराने मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात सायंकाळी 5.20 च्या सुमारास अखेरचा श्‍वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्‍चात मुलगी संजना आणि कुणाल व करण ही दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या (मंगळवार) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे पुतणे व अभिनेते रणधीर कपूर यांनी सांगितले.
शशी कपूर यांच्या निधनामुळे बॉलीवूड शोकसागरात बुडाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शशी कपूर हे किडनीविकाराने त्रस्त होते. त्यांचे नियमित डायलिसिस करावे लागत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्या तोडीस तोड अभिनय करणार्‍या शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी झाला. प्रख्यात चित्रपट व नाट्य अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे सर्वात धाकटे पुत्र असलेल्या शशी कपूर यांनी पृथ्वी थिएटरच्या ‘शकुंतला’ नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. राज कपूर याचा पहिला चित्रपट ‘आग’ आणि तिसरा चित्रपट ‘आवारा’मध्ये शशी कपूर यांनी आपले वडीलबंधू राज कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. शशी कपूर यांनी 1940 मध्ये बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर घट्ट पाय रोवले. यश चोप्रा यांच्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटाद्वारे शशी कपूर यांनी चित्रपटसृष्टीत नायक म्हणून पदार्पण केले होते. सिनेसृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 160 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी 61 चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. 2011 मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण देऊन गौरव केला तर 2015 मध्ये त्यांना सरकारने दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे शशी कपूर हे कपूर घराण्यातील तिसरे अभिनेते होते. या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. 1970 ते 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांमध्ये शशी कपूर यांचा समावेश होत असे.
‘धर्मपुत्र’नंतर शशी कपूर यांचे ‘चार दिवारी’ आणि ‘प्रेमपत्र’ यासारखे चित्रपट अपयशी ठरले होते. त्यांचे ‘मेहंदी लगी मेरे हाथ’, ‘मोहब्बत इसको कहते हैं, ‘नींदहमारी ख्वाब तुम्हारे’, ‘जुआरी’, ‘कन्यादान’, ‘हसीना मान जाएगी’ हे  चित्रपटही फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत. मात्र, ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटाद्वारे शशी कपूर यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला. राज कपूर यांच्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या चित्रपटातील शशी कपूर यांची भूमिका विशेष गाजली. ‘वक्त’, ‘शर्मिली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दिवार’, ‘कभी कभी’, ‘फकिरा’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या.
1970 च्या दशकात रोमँटिक हिरो शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांचे बंधू व अभिनेते शम्मी कपूर यांनी आपल्या वेगळ्या अभिनय आणि नृत्यशैलीने चित्रपटरसिकांमध्ये अढळ स्थान निर्माण केले होते. त्यामुळे शशी कपूर यांना स्वत:ला रोमँटिक हिरो म्हणून प्रस्थापित करताना मेहनत घ्यावी लागली. त्यासाठी त्यांनी स्वत:ची अशी वेगळी नृत्यशैली निर्माण केली. ही नृत्यशैली आणि देखणेपणामुळे ते रोमँटिक भूमिकांमध्येही यशस्वी ठरले. नलिनी जयवंत, माला सिन्हा, तनुजा, नंदा यांच्यापासून रेखा, राखी, नीतू सिंग यासारख्या अनेक अभिनेत्रींसोबत शशी कपूर यांनी काम केले. ‘जब जब फूल खिलें’ या सिनेमातील गाणी चांगलीच गाजली. ‘खिलते हैं गूल यहाँ’, ‘घुंगरूकी तरह बजताही रहाँ हूँ मै’, ‘परदेसीयोंसे ना अखिया मिलाना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशी शशी कपूर यांची अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत.
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांची जोडी तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. ‘दिवार’ या चित्रपटात ही जोडी प्रथम एकत्र आली. या चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी नवीन निश्‍चल यांना विचारले होते. मात्र, नवीन निश्‍चल यांनी चित्रपटास नकार दिल्याने ही भूमिका शशी कपूर यांच्या वाट्याला आली. येथूनच अमिताभ-शशी यांच्या सुपरहिट जोडीचा प्रवास सुरू झाला. या जोडीचे ‘सिलसिला’, ‘नमक हलाल’, ‘सुहाग’, ‘त्रिशूल’, ‘कभी कभी’ हे चित्रपट सुपरहीट झाले. दिवार चित्रपटातील ‘मेरे पास मां हैं’ हा शशी कपूर यांचा संवाद आजही लोकांच्या ओठांवर आहे. हे चित्रपट अमिताभ यांच्याभोवती केंद्रित असले तरी शशी कपूर यांची भूमिका मात्र खास असायची. त्यांचा अभिनय पाहण्यासाठीही लोक थिएटरमध्ये गर्दी करत.
हल्ली प्रियांका चोप्रा, इरफान खान, दीपिका पदुकोन असे बॉलीवूडमधील अभिनेते, अभिनेत्री हॉलीवूडपटांमध्ये चमकत आहेत. मात्र, त्यांच्या कित्येक वर्षे आधी शशी कपूर हे आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षितिजावर चमकले होते. त्यांनी ‘द हाउसहोल्डर’, ‘शेक्सपियरवाला’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘हिट अँड डस्ट’ अशा ब्रिटिश आणि अमेरिकी चित्रपटांमधून चमकदार भूमिका केल्या होत्या. मर्चंट-आयव्हरी प्रॉडक्शन्सच्या चित्रपटांनी शशी कपूर यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीत व्यस्त असतानाही शशी कपूर यांचे रंगभूमीवरील प्रेम कायम होते. आपले वडील पृथ्वीराज कपूर यांचा रंगभूमीचा वारसा शशी कपूर यांनी आपली पत्नी जेनिफर केंडाल यांच्या साथीने पुढे सुरू ठेवला. हिंदी सिनेसृष्टीच्या झगमगाटात राहूनही कलात्मकतेची कास धरण्याचे आणि रंगभूमीची निष्ठेने सेवा करण्याचे हे उदाहरण विरळच. शशी कपूर यांनी 1978 मध्ये पृथ्वी थिएटर पुन्हा नावारूपाला आणले. त्यामध्ये जेनिफर यांचा मोलाचा वाटा होता. शशी कपूर हे फारसे गॉसिपमध्ये अडकले नाहीत. 1984 मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर एकटे पडले होते. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले. शशी कपूर यांच्या पृथ्वी थिएटरची धुरा आता त्यांची मुलगी संजना कपूर ही सांभाळत आहे.
त्याचबरोबर कलात्मकतेचा वसा जोपासण्यासाठी शशी कपूर यांनी अनेक अभिजात चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले. ‘जुनून’ (1978), ‘कलियुग’ (1980), ‘36 चौरंगी लेन’ (1981), ‘विजेता’ (1982), ‘उत्सव’ (1984) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती शशी कपूर यांनी केली होती. श्याम बेनेगल यांच्यासमवेत त्यांनी निर्मिती केलेल्या ‘कलयुग’ चित्रपटाचा खास उल्लेख करावा लागेल. बेनेगल  दिग्दर्शित या चित्रपटात शशी कपूर, रेखा, राज बब्बर, अनंत नाग, अमरीश पुरी, व्हिक्टर बॅनर्जी, ए. के. हंगल, विजया मेहता, ओम पुरी, रिमा लागू, सलीम घोष, मदन जैन अशी कलाकारांची फौज होती. बेजुबान, क्रोधी, बसेरा, भवानी जंक्शन या सिनेमांमधूनही त्यांचा वेगळ्या धाटणीचा अभिनय सिनेरसिकांनी पाहिला.
शशी कपूर यांच्या निधनाबद्दल बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन व अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, अनेक राज्यांचे मंत्री यांनीही शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली व शोक व्यक्त केला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे, भारतीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधील सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आपल्याला अतिशय दु:ख झाले आहे. सार्थक चित्रपटांमधील त्यांचे योगदान आणि भारतीय रंगमंचाला शक्ती देण्याची त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका कायम स्मरणात राहील.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: