Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा सुवर्णमहोत्सव
ऐक्य समूह
Tuesday, December 05, 2017 AT 11:58 AM (IST)
Tags: re6
कराडमध्ये रविवारी कार्यक्रम; ‘भारत छोडो’ आंदोलनाचा अमृतमहोत्सव
5कराड, दि. 4 : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील 1942 च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृतमहोत्सव आणि रयत संघटना व माजी मंत्री, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा सुवर्णमहोत्सव, असा संयुक्त सोहळा रविवार, दि. 10 रोजी कराड येथील कल्याणी मैदान, बैलबाजार रोड, मार्केट यार्ड येथे दुपारी 2 वाजता आयोजित केल्याची माहिती रयत संघटना सुवर्णमहोत्सव समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी विलासराव पाटील-उंडाळकर, रयत संघटना सुवर्णमहोत्सव समितीचे आर. के. भोसले, प्राचार्य गणपतराव कणसे, प्रा. भिसे,धनाजी काटकर,   सज्जन यादव व मान्यवर उपस्थित होते.
धनाजी काटकर म्हणाले, या संयुक्त सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, आ. गणपतराव देशमुख यांच्या हस्ते उंडाळकर यांना मानपत्र देण्यात येणार आहे. सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. पतंगराव कदम, आ. जयंत पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार उल्हास पवार, कवी रामदास फुटाणे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, कवी ना. धों. महानोर, फ. मुं. शिंदे, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, साधनाचे संपादक विनोद शिरसाट, समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सलग 50 वर्षे आपले योगदान देत विकासकामात मैलाचा दगड ठरलेले आणि विधानसभेत कराड दक्षिणचे सलग 35 वर्षे प्रतिनिधित्व करणार्‍या माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी राज्यात विकासाचा पॅटर्न तयार केला. लोकप्रतिनिधींसाठी त्यांनी वस्तुपाठ घालून दिला आहे. जिल्ह्यात सर्वत्र काँग्रेसची पडझड होत असताना कराड दक्षिणेत विजय मिळवून उंडाळकरांनी काँग्रेसला नवसंजीवनी दिली.
भारतीय पारतंत्र्याच्या काळात उंडाळे या छोट्याशा गावात स्वातंत्र्यलढ्यात उडी मारलेल्या बाळकृष्ण उर्फ स्व. दादा उंडाळकर या शेतकरी स्वातंत्र्यसैनिकाच्या घराण्यात दि. 15 जुलै 1938 रोजी विलासकाकांचा जन्म झाला. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करुन एलएलबीचे शिक्षण घेतले. जिल्ह्याच्या ठिकाणी वकिली व्यवसाय सुरु केला. वकिली करताना ते राजकारणात सक्रिय झाले.
त्यांचे घराणे स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले आणि गावगाडा चालवताना गोरगरीब रयतेच्या समस्या सोडवण्यात व मदत करण्यात आघाडीवर होते. काकाही गाव व तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले. 1967 साली काका सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरले आणि विजयी झाले. 1968 साली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदावर निवडले गेले. पुढे या बँकेचे उपाध्यक्ष व नंतर अध्यक्ष झाले. नाबार्डचा उत्कृष्ट कामाबाबतचा पुरस्कार सलग सहा वेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळला, तो त्यांच्या कार्यकाळातच.
जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असतानाच त्यांचा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याशी निकटचा संबंध आला. 1968 सालीच ते जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले. या पदावर ते 1972 पर्यंत होते. 1977 साली ते जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बनले आणि नंतर अध्यक्ष बनले. या पदावर त्यांनी 1972 पर्यंत काम केले. पायपीट करुन जिल्ह्यातील वाड्या-वस्त्या व घराघरात काँग्रेसची ध्येयधोरणे व कार्यक्रम पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले.
रयत संघटना व विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा सुवर्णमहोत्सव असा संयुक्त सोहळा आयोजित करण्याची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार काकांनाही ही विनंती करण्यात आली. त्यांनी सुरुवातीला ती नाकारली; परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी सत्कार सोहळ्यात हाततुरे स्वीकारणार नाही, या अटीवर होकार दिला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा अमृतमहोत्सव आणि रयत संघटना व विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा सुवर्णमहोत्सव अशा संयुक्त सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ध्येय व तत्त्वापासून काका कधीही ढळले नाहीत. राष्ट्रीय विचारधारेशी एकरुप राहून वाटचाल करणार्‍या काकांच्या सत्कार सोहळ्यात दिग्गज विचारवंत व अभ्यासू मान्यवर सहभागी होणार असल्याने या कार्यक्रमात एक प्रकारचे विचारमंथन होणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: