Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निढळ गावच्या हद्दीत पोकलॅनचे खोरे लागून एक ठार, एक जखमी
ऐक्य समूह
Saturday, December 02, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: re1
5पुसेगाव, दि. 1 :निढळ गावच्या हद्दीत सातारा-पंढरपूर रस्त्यावर पोकलॅनचे माती ओढण्याचे खोरे लागल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबन विष्णू दळवी (रा. निढळ, वय 68) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत पोकलॅन चालक राजू श्रीरामचंद्र साव (रा.अरखांन्गो, झारखंड) याच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत दादू मर्ढेकर (व्यवसाय रिक्षा चालक, रा.सह्याद्रीनगर, इसबावी, पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातारा-पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. सकाळी 11 च्या सुमारास निढळ गावच्या हद्दीत रोडवरील पुला जवळ पंढरपूर बाजूकडून येणार्‍या व्हॉल्व्हो कंपनीच्या पोकलॅनवरील चालक राजू श्रीरामचंद्र साव याने पुसेगाव (सातारा) बाजूकडून येणार्‍या टी व्ही. एस. एक्स.एल. मोटरसायकलीच्या डाव्या बाजूला पोकलॅनचे माती ओढण्याचे खोरे धडकविल्याने दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्यातील आबा दामू इंजे (रा.निढळ, वय-67) हे गंभीर जखमी झाले तर मागे बसलेले बबन विष्णू दळवी हे जागीच ठार झाले. दरम्यान, जखमी आबा इंजे यांना 108 रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.  बबन दळवी यांच्या मृतदेहाचे पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. जाधव यांनी शवविच्छेदन केल्यानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोकलॅन चालकास ताब्यात घेण्यात आले असून सपोनि. संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जाधव तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: