Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘जीएसटी’मुळे व्यापार करणे अधिक सुलभ
ऐक्य समूह
Saturday, December 02, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: na3
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकासदर वाढल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आणखी हुरुप आला आहे. जीएसटीमुळे व्यापार्‍यांना उद्योग करणे आणि त्याचा विस्तार करणे अधिक सुलभ झाले आहे. त्याचबरोबर कराचा बोजाही कमी करणे शक्य झाले आहे, असा दावा जेटली यांनी केला आहे. केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी व नोटाबंदी या दोन आर्थिक सुधारणांचा लाभ मध्यम आणि दीर्घ कालावधीत मिळणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
जेटली म्हणाले, जीएसटीमुळे उद्योग आणि व्यापार करणे अधिक सुलभ झाले आहे. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा प्रभाव एक-दोन तिमाहींपुरता मर्यादित राहिला आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे सुरुवातीला असलेला नकारात्मक प्रभाव एका तिमाहीपुरताच मर्यादित होता. उद्योगांना आधीचा साठा काढून टाकायचा असल्याने हा प्रभाव मर्यादित होता, हे आमचे मूल्यमापन आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ताज्या आकडेवारीने ते सिद्ध झाले आहे. आर्थिक सुधारणांचे फायदे मध्यम आणि दीर्घ कालावधीत मिळणार आहेत. जीएसटी आणि नोटाबंदी अर्थव्यवस्थेला फायदेशीरच आहे, असे जेटली यांनी सांगितले.
नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे गेल्या पाच तिमाहींमधील घटना सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत सुधारला आहे.
जुलै-सप्टेंबर या दुसर्‍या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकासदर 6.3 टक्क्यांवर गेला आहे. मात्र, जीएसटीशी
जुळवून घेण्यात उद्योग जगताचा वेळ गेल्याने हा विकासदर गेल्या तीन वर्षांमधील नीचांकी आहे. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वृद्धीदरही 5.7 टक्के इतका गेल्या तीन वर्षांतील नीचांकी
राहिला आहे. मात्र, जीएसटीमुळे व्यापार्‍यांवरील करपूर्ततेचा बोजा कमी झाला आहे. नव्या करप्रणालीमुळे व्यापार्‍यांना अनेक
करांची विवरणपत्रे भरणे आवश्यक नाही. जीएसटीचे टप्पेही सुलभ करण्यात आल्याने व्यापार्‍यांना आता निरीक्षकांची भीती नाही, असे जेटली म्हणाले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: