Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चिदम्बरम यांच्या नातेवाइकांवर छापे
ऐक्य समूह
Saturday, December 02, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: na2
एअरसेल-मॅक्सिस करार प्रकरण
5चेन्नई, दि. 1 (वृत्तसंस्था) : एअरसेल-मॅक्सिस विलीनीकरण करारात झालेल्या घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या नातेवाइकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी सहा ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात चिदम्बरम यांचे चिरंजीव कार्ती चिदम्बरम यांचा सहभाग आहे.
या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी चेन्नईत सहा ठिकाणी आणि कोलकाता येथे दोन ठिकाणी छापे टाकले. चेन्नईमधील तेयनामपेट येथे एका रुग्णालयासह दोन ठिकाणी, अलवारपेट व तिरुवनमियूर आणि कोलकाता येथे ली रोड व लवलॉक प्लेस या ठिकाणी झडतीसत्र सुरू होते. एअरसेल-मॅक्सिस कराराला 2006 मध्ये परकीय गुंतवणूक प्रसार मंडळाने परवानगी दिली होती. या करारात पैशांची मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचा आरोप कार्ती चिदम्बरम यांच्यावर आहे. 
या प्रकरणी सुरू असलेल्या जप्तीच्या कारवाईत विघ्न आणण्यासाठी कार्ती चिदम्बरम यांनी काही विशिष्ट बँक खाती बंद केली तर काही बँक खाती बंद करण्याचा प्रयत्न केला, असा ठपका अंमलबजावणी संचालनालयाने ठेवला आहे. दरम्यान, ही सर्व कारवाई राजकीय सूडबुद्धीने सुरू असल्याचा आरोप चिदम्बरम यांनी केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: