Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
करवडी उपसरपंच अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Saturday, December 02, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 1 : करवडी, ता. कराड येथील उपसरपंचाचे अपहरण करून तिघांनी सरपंचावरील अविश्‍वास ठरावाला सहमत नसल्याच्या ठरावावर तसेच नोटरीवर जबरदस्तीने सह्या घेतल्याची तक्रार उपसरपंच अमोल भिकू माळी यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरुन आनंदा भिकोबा पिसाळ, नानासाहेब एकनाथ सूर्यवंशी व राजेंद्र अधिकराव पिसाळ (सर्व रा. करवडी) या तिघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, करवडी येथील अमोल माळी हे करवडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून त्यांचा रिक्षातून प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आहे. मंगळवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी अमोल माळी हे रिक्षा घेऊन कराड येथे आले होते. कराडमधून काही प्रवासी घेऊन सकाळी 9.30 च्या सुमारास ते पुन्हा करवडी गावात गेले. त्या ठिकाणी आनंदा पिसाळ, नानासाहेब सूर्यवंशी व राजेंद्र पिसाळ या तिघांनी भाडेतत्वावर रिक्षा ठरवून अमोल माळी यांना घेऊन कराड तहसील कार्यालय गाठले. त्या ठिकाणी नानासाहेब सूर्यवंशी याने काही कागदपत्रांची जुळवाजुळव केली. तसेच उंब्रजला जायचे आहे, असे त्यांना सांगितले. अमोल माळी यांनी रिक्षा घेऊन उंब्रजला येण्यास नकार दिला. त्यावेळी आनंदा पिसाळ याने शिवी-गाळ, धक्काबुक्की केल्याने अमोल माळी रिक्षा घेऊन त्या तिघांसमवेत उंब्रजला गेले. वाटेमध्ये आनंदा पिसाळ याने रिक्षा थांबवायला सांगून
अमोल माळी यांना मारहाण करत त्यांच्या खिशातील 1 हजार 800 रुपये काढून घेतले व पुन्हा ते तिघे रिक्षात बसले. अमोल माळी यांना रिक्षा सातारा येथे नेण्यास सांगितली. सातारा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेल्यानंतर आनंदा पिसाळ याने अमोल
माळी यांना धमकावले. घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना काहीही सांगायचे नाही, असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वकिलांसमोर नेवून त्या तिघांनी नोटरी करुन त्यावर अमोल
माळी यांच्या सह्या घेतल्या. तसेच अविश्‍वास ठरावास संमती नसल्याच्या ठरावावरही सह्या घेतल्या. त्यानंतर संबंधित
तिघेजण पुन्हा रिक्षातून करवडी येथे आले. रात्री 8 वाजता त्यांनी अमोल माळी यांना आनंदा पिसाळ याच्या शेडवर आणून सोडले आणि या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची नाही, अशी धमकी दिली. याबाबत अमोल माळी यांनी शुक्रवारी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: