Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्जबाजारी शेतकर्‍याला ‘तारीख पे तारीख’
ऐक्य समूह
Saturday, December 02, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: mn3
अजित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
5यवतमाळ, दि. 1 (वृत्तसंस्था) : राज्यात डॉक्टर, वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन यांच्यासह समाजातील एकाही घटकाला भाजप-शिवसेना सरकारकडून न्याय मिळत नाही. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हल्लाबोल आंदोलन करत आहे. आता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. या सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी केल्याची घोषणा केली; परंतु शेतकर्‍यांना आतापर्यंत ‘तारीख पे तारीख’शिवाय काहीही मिळालेले नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने यवतमाळ येथे शुक्रवारी राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात शेतकर्‍यांची 71 हजार कोटींची कर्जमाफी झाली. मात्र, आताचे सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफीची ‘तारीख पे तारीख’ देत आहे. हे सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊ शकणार नाही, कारण हे सरकार कर्जबाजारी आहे. खोट्या जाहिराती देऊन हे सरकार आपल्या करातून जमा होणार्‍या पैशावर डल्ला मारत आहे. ज्या लोक-सभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला भरभरून मतदान केले, त्याच सरकारच्या काळात विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. मुख्यमंत्री, अर्थमंत्री व कृषिमंत्री विदर्भाचे आहेत. असे असतानाही विदर्भात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकर्‍यांना दीड लाखाची कर्जमाफी नको तर सातबारा कोरा करा, अशी मागणी त्यांनी केली.
सुनील तटकरे म्हणाले, दांभिकपणाचा आव आणणार्‍या आणि राजकारण करणार्‍या खोटारड्या सरकारला खाली खेचल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही. राज्यातील शेतकर्‍यांच्या महिलांचे कुंकू पुसणार्‍या सरकारला थार्‍यावर आणण्यासाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: