Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुसर्‍या तिमाहीत विकासदर 6.3 टक्क्यांवर
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: mn1
जीएसटी, नोटाबंदीचा प्रभाव संपुष्टात : जेटली
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : आर्थिक मुद्द्यांवरून चौफेर टीकेचे धनी झालेल्या मोदी सरकारला दिलासा देणारी आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या दुसर्‍या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर 6.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. पहिल्या तिमाहीत हा दर 5.7 टक्के होता. हा तीन वर्षातील सर्वांत कमी दर होता. दरम्यान, जीएसटी आणि नोटाबंदीचा प्रभाव संपुष्टात आला असून सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांची फळे दिसू लागल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
जुलै महिन्यात देशभरात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर विकासदराची ही पहिलीच आकडेवारी आहे. यावरून भारतीय अर्थव्यवस्थेवर जीएसटीचे सकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा आता सरकारला करता येणार आहे. येत्या काळात अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी सुधारू शकते, अशी अपेक्षा आहे. आता नोटाबंदीचा परिणाम संपला असून कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे येत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेली ही आकडेवारी मोदी सरकारला दिलासा देणारी आहे.
देशाचे मुख्य संख्याशास्त्रज्ञ टीसीए अनंत म्हणाले, गेल्या पाच तिमाहींमध्ये विकासदरात घट झाल्यानंतर त्यात आता पुन्हा वाढ होत आहे. ही बाब खूप सकारात्मक आहे. यापैकी सर्वाधिक 7 टक्के वाढ उत्पादन क्षेत्रात दिसून आली आहे. वीज, गॅस आणि पाणी पुरवठा या क्षेत्रांचा विकासदर 7.6 टक्के राहिला आहे. व्यापार, हॉटेल, वाहतूक व कम्युनिकेशन क्षेत्रात 9.9 टक्के वाढ दिसून आली आहे. मात्र, बांधकाम, कृषी, रिअल इस्टेट, अर्थपुरवठा या क्षेत्रात घट सुरूच आहे.
दुसर्‍या तिमाहीत कृषी, वने, मासेमारी, खाणउद्योग, बांधकाम, अर्थपुरवठा, विमा, रिअल इस्टेट, व्यावसायिक सेवा आणि सार्वजनिक प्रशासन, संरक्षण व अन्य सेवांचा विकासदर अनुक्रमे 1.7, 5.5, 2.6, 5.7 व 6 टक्के राहिला आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे पहिल्या तिमाहीत विकासदर मंदावला होता. मात्र, आता यातून उद्योग जगत बाहेर पडत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. एका सर्वेक्षणानुसार अर्थतज्ज्ञांनी जीडीपीचा विकासदर दुसर्‍या तिमाहीत 6.4 टक्के राहील, असे भाकीत वर्तवले होते तर काही संस्थांनी हा विकासदर 5.9 टक्के ते 7.1 टक्के या दरम्यान राहील, असे म्हटले होते.        
ही वाढ मुख्यत्वे खाण आणि उत्पादन क्षेत्रामुळे झाली आहे. खाण क्षेत्रात मागील तिमाहीत विकासदर 0.7 टक्के होता. तो दुसर्‍या तिमाहीत 5.5 टक्क्यांवर गेला असून उत्पादन क्षेत्रात विकासदर 1.2 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवर गेला आहे. एसबीआयच्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितले, की पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढीचा दर 5.7 टक्के होता. दुसर्‍या तिमाहीत त्यात वाढ होऊन 6.3 ते 6.4 टक्क्यांच्या आसपास राहू शकतो. सकल मूल्यावर आधारित विकास दर 6.1 ते 6.2 टक्के राहील. ही आकडेवारी विविध क्षेत्रांमधील आर्थिक घडामोडींवर अवलंबून आहे. विशेषत: ज्या क्षेत्रांवर नोटाबंदीचा परिणाम झाला होता, त्या क्षेत्रांमध्ये जूनच्या तिमाहीतील विकासदर घसरला होता.
आर्थिक सुधारणांचे सकारात्मक परिणाम
दरम्यान, दुसर्‍या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर पाहता नोटाबंदी आणि जीएसटीचा प्रभाव संपुष्टात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांचा हा सकारात्मक परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. उत्पादन क्षेत्रातील तेजी हे जीडीपीचा वृद्धीदर वाढण्याचे मुख्य कारण असून चौथ्या तिमाहीत त्यात आणखी वाढ झालेली दिसेल, असा विश्‍वास जेटली यांनी व्यक्त केला. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीही विकासदर वृद्धीचे स्वागत केले आहे. त्याच वेळी त्यांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धीदर 6.3 टक्के झाला, ही स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळे गेल्या पाच तिमाहींमधील घसरण तात्पुरती थांबली आहे. मात्र, आपल्याला पुढील तीन ते चार तिमाहींमधील वृद्धीदरावर लक्ष ठेवावे लागेल. त्यानंतरच आपल्याला अंतिम निष्कर्ष काढता येईल, असे चिदम्बरम म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: